कोणत्या उमेदवाराच्या खर्चात दाखवणार राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च ?

raj-thakre1
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राहुल गांधींना एक संधी देण्याचे आवाहन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदारांना केले होते. आता, ते राज्यभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करण्यासाठी आठ-दहा सभाही घेणार आहेत. नांदेडला त्यातील पहिली सभा झाली. राज यांनी भाजपाला मत देऊ नका, असे त्यात सांगितले. पण, त्यांनी मत कुणाला द्यायचे हे सांगणे टाळलं. या पार्श्वभूमीवरच, राज्य निवडणूक आयोगाला राज्याचे शिक्षण मंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे यांनी एक पत्र लिहिले आहे. कोणासाठी राज ठाकरे यांच्या जाहीर प्रचार सभा असून कोणत्या उमेदवाराच्या खर्चामध्ये या सभांचा खर्च दाखवला जाणार आहे, यासंदर्भात राज्य निवडणुक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीत मनसेने पक्षाचा एकही अधिकृत उमेदवार उभा केलेला नाही. राज ठाकरे मोदींना पराभूत करण्यासाठी राहुल गांधींच्या उमेदवारांना निवडून द्या, शरद पवारांच्या उमेदवारांना निवडून द्या, असा प्रचार करत आहेत. पण काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार आपल्या निवडणूक प्रचार खर्चात या प्रचार सभांचा खर्च दाखवत नाही. जर कोणत्याच उमेदवाराचे राज ठाकरे नाव घेत नसतील तर तो खर्च त्या उमेदवाराच्या खात्यात कसा दाखवायचा, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. पण राज ठाकरे यांचा प्रचार हा पूर्णतः राजकीय आहे. राहुल गांधी, शरद पवार यांच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठीच असल्यामुळे जिथे राज यांची सभा होईल, त्या ठिकाणच्या आघाडीच्या उमेदवाराच्या निवडणूक खर्चात सभेचा खर्च दाखवला जावा, अशी आग्रही भूमिका विनोद तावडे यांनी मांडली आहे.

Leave a Comment