३१ डिसेंबरला दक्षिण कोरियात जन्मणारे मूल चक्क १ जानेवारीला होते दोन वर्षांचे

korea
सेऊल – ३१ डिसेंबर २०१८ रोजी दक्षिण कोरियातील देईजिओनमध्ये ली डाँग किल यांच्या मुलीचा जन्म झाला. त्यांच्यावर आप्तेष्टांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. पण, अशाच शुभेच्छा दुसऱ्याच दिवशी १ जानेवारीला पुन्हा सुरू झाल्या. कारण त्यांच्या मुलीने या दिवशी चक्क वयाची दोन वर्षे पूर्ण केली होती. तुम्हाला प्रश्न पडेल की, असे कसे काय शक्य आहे? पण, हे सत्य आहे.

वय मोजण्याची कोरियन संस्कृतीमध्ये एक विशिष्ट प्रणाली आहे. मूल जन्मले की त्याचे वय एक वर्ष मानले जाते आणि त्याच्या जन्मदिनाऐवजी त्याचे वय नव्या वर्षाच्या हिशेबाने वाढत जाते. अशा प्रकारे ३१ डिसेंबरला जन्मलेले मूल जन्माच्या दुसऱ्याच दिवशी चक्क दोन वर्षांचे होते. द. कोरियन माणसाचे घोषित वय म्हणूनच पाश्चिमात्य परंपरेतील वयाच्या हिशेबापेक्षा एक किंवा दोन वर्षांहून अधिक असते. द. कोरियात लोक आता या परंपरेला विरोध करत आहेत. प्राचीन परंपरेमुळे पडणारा वयातील हा बदल आता थांबायला हवा, असे या लोकांना वाटते.

वय मोजण्याची जी पद्धत जागतिक पातळीवर आहे या लोकांना तीच आता हवी आहे. या लोकांचे सध्या दुहेरी वय आहे. ही पद्धत बदलण्यासाठी आता संसदेत प्रस्ताव मांडला जात आहे. वास्तविक, चीनमध्ये वय मोजण्याची ही पद्धत सुरू झाली होती. पण, कालांतराने या पद्धतीचा कोरियात वापर सुरू झाला. कोरियन माणसे साधारणपणे परंपरा जपणारी म्हणून ओळखली जातात. पण, याला आता तेच विरोध करत आहेत. स्पर्धेच्या या युगात मग ते क्रीडा क्षेत्र असो किंवा शिक्षणाचे क्षेत्र असो, कोरियन माणूस पिछाडीवर राहायला नको म्हणून येथील लोकांना जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त प्रणाली हवी आहे. कोरियातील खासदार ह्यांग जू हांग म्हणाले, यासाठी संसदेत लवकरच दुरुस्ती विधेयक मांडले जाणार आहे. या माध्यमातून वय मोजण्याची प्राचीन परंपरा बंद होईल.

पूर्व आशियाई देशांत चीन आणि जपानमध्येही वय मोजण्याची ही परंपरा होती. पण या देशांनी ही पद्धत काळानुरूप बदल करत बंद केली. फक्त कोरियातच ही परंपरा आजही पाळली जात आहे. पुढील महिन्यात संसदेतील प्रस्तावानंतर ही पद्धत बंद होईल.

Leave a Comment