नवी दिल्ली – अनिल अंबानी यांच्या फ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला राफेल करारानंतर फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी १४३.७ मिलियन युरो म्हणजेच सुमारे ११२० कोटींची करमाफी दिली असा दावा फ्रेंच वृत्तपत्र ले माँडने केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल करारावरून घोटाळ्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल करारात लक्ष्य घालून काही फेरबदल केले आणि ३० हजार कोटींचा फायदा अनिल अंबानींना करून दिला असाही आरोप करण्यात आला आहे.
फ्रेंच वृत्तपत्रात अनिल अंबानींना ११२० कोटींची करमाफी दिल्याचा दावा
राफेल या लढाऊ विमान खरेदीसाठी करार २०१५ या वर्षत फेब्रुवारी ते ऑक्टोबर महिन्यांच्या कालावधीत सुरु होता. अनिल अंबानी यांच्या फ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला नेमक्या याच कालावधीत ११२० कोटींची करमाफी देण्यात आल्याचा दावा ले माँड या वृत्तपत्राने केल्यामुळे विरोधकांच्या हाती लोकसभा निवडणुकांच्या काळात आणखी एक कोलीत आले आहे.
आता ले माँडने दिलेल्या करमाफीच्या आरोपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल करारादरम्यान मध्यस्थ म्हणून भूमिका बजावल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. राहुल गांधींसह सगळ्याच प्रमुख काँग्रेस नेत्यांनी राफेल करार झाल्यापासूनच राफेल करारात घोटाळा झाला असल्याचा आरोप केला. तसेच मोदींनी देशातील जनतेचे पैसे लुटून अनिल अंबानींना दिले असेही राहुल गांधींनी वारंवार म्हटले आहे. अनिल अंबानी यांच्या फ्रान्स येथील कंपनीला ११२० कोटींची करमाफी दिल्याचे वृत्त आता फ्रान्स मीडियाने दिले आहे. त्यावरून एकच खळबळ उडाली आहे.