उदयनराजेंना आव्हान देताना नरेंद्र पाटलांची जीभ घसरली

narendra-patil
सातारा : शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांची जीभ साताऱ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजेंवर टीका करताना घसरली आहे. दोन वेळा आपल्यावर प्राणघातक हल्ले झाले. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही सांगा तिथे येईन, असे आव्हान उदयनराजेंना नरेंद्र पाटील यांनी दिले आहे. उदयनराजेंना यावेळी आव्हान देताना त्यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले.

काल साताऱ्याच्या कोरेगावात महायुतीची सभा झाली. ते त्यावेळी बोलत होते. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते. उदयनराजे यांच्याविरोधात साताऱ्यात भाजपतून शिवसेनेत आलेले नरेंद्र पाटील रिंगणात आहेत. नरेंद्र पाटील यांनी सभेत उदयनराजे भोसले यांना अर्वाच्च भाषेचा वापर करत खुले आवाहन दिले. त्यांनी उदयनराजेंनी केलेल्या विकास कामाबाबत सांगताना दुसऱ्याच्या पोराला आपले नाव का देता, असे म्हणत स्वत:च्या पोराकडे लक्ष देण्याचा सल्ला देखील दिला.

नरेंद्र पाटील यावेळी म्हणाले की, दोनदा माझ्यावर प्राणघातक हल्ले झाले. आता मरणाची भीती मला नाही. तुम्ही मर्द मराठे आहात. तुमच्यात दम नसेल तर मला सांगा, मी तिकडे येतो, असे एकेरीत उल्लेख करत अर्वाच्च भाषेचा वापर केला. सातारा चौदा वर्षात टोलमुक्त होऊ शकला नाही. खासदार झाल्यानंतर सातारा जिल्हा टोलमुक्त करणार असल्याचे ते म्हणाले.

डिफरंट कॅरेक्टर जिल्ह्यात आहे. पत्रकारांनी प्रश्न विचारला की खामोश म्हटले जाते. विकासावर खासदारांना बोलता येत नाही. टीव्ही चॅनेलवर 17 हजार कोटींचा विकास होता. पत्रकार परिषदेत 18 हजार कोटी झाला. आठ दिवसात हजार कोटी कसे वाढले हेच समजले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. मोदींनी आणि आमच्या मंत्र्यांनी विकास कामे केली. तुम्ही दुसऱ्याच्या पोराला आपल नाव का देता, कृपाकरून आपण आपल्या पोराकडे पाहावे, असेही पाटील म्हणाले.

Leave a Comment