तुमचा स्मार्ट फोन तुम्हाला आजारी तर बनवीत नाही ना?


आजकाल प्रत्येकाकडे स्मार्ट फोन असणे, ही चैनीची बाब नसून काळाची गरज बनली आहे. पण ह्या फोनचा वापर गरजेपुरताच होतो असे नाही. आपण कुठे ही असा, मार्केट मध्ये, ऑफिसमध्ये किंवा घरी, आजकाल जवळ जवळ प्रत्येक जण हातातला फोन न्याहाळण्यात व्यस्त असतो. जेवताना, प्रवास करताना, इतकेच नाही, तर अगदी रात्री झोपेपर्यंत आपली बोटे आणि डोळे मोबाईलवरच असतात. दिवसभराच्या कामांच्या धांदलीमध्ये कितीही दमछाक झाली असली, तरी अधून मधून आपला फोन चेक करायला आपण कधीच विसरत नाही. मोबाईल फोनच्या तंत्रज्ञानाने आपले आयुष्य खरेच खूप सोपे करून टाकले असले, तरी ह्याचा अतिवापर आपल्या आरोग्यासंबंधी तक्रारींना कारणीभूत ठरू शकतो.

मोबाईल फोनचा अति वापर शारीरिक आणि मानसिक रोगांना कारणीभूत ठरू शकतो. अलीकडे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनेक शोधांमध्ये, सर्वेक्षणांमध्ये हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झाले आहे. मोबाईल फोनच्या अतिवापराने गंभीर रोगही उद्भविण्याची शक्यता असल्याचे ह्या सर्वेक्षणांवरून स्पष्ट झाले आहे. अनेक अध्ययनांवरून हे निदान करण्यात आले आहे की मोबाईल फोनच्या अति वापरामुळे निद्रनाशासारख्या तक्रारी उद्भवितात. रात्री उशीरापर्यंत फोनवर बोलणे, मेसेज करणे किंवा पाहत राहणे, सोशल मिडिया साईट्स वर अॅक्टिव्ह असणे, ह्यामुळे झोपेशी निगडीत समस्या सुरु होतात. ह्यांनाच वैद्यकीय भाषेमध्ये ‘स्लीप डिसॉर्डर्स’ म्हटले जाते.

सेलफोन मधून उत्सर्जित केली जाणारी किरणे ( रेडीयेशन ) कर्करोगासारख्या गंभीर रोगासाठी कारणीभूत ठरू शकतात. इतकेच नाही, तर ही किरणे हृदयरोगासारख्या क्रोनिक ( कायमस्वरूपी ) रोगांसाठी देखील कारणीभूत ठरू शकतात. युरोपियन जर्नल ऑफ ऑन्कोलॉजी मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधानुसार मोबाईल किंवा कॉर्डलेस फोन मधून उत्सर्जित होणारी किरणे हृदयाच्या कार्यामध्ये असामान्यता आणि अडथळे निर्माण करू शकतात. जे पुरुष मोबाईल फोनचा अति वापर करीत असतील, त्यांनी देखील ह्या सवयीपासून लांब राहणे अगत्याचे आहे. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे पुरुषांचे स्पर्म सेल काउंट कमी होत असल्याचे निदान एका सर्वेक्षणाद्वारे करण्यात आले आहे.

आजकाल रस्त्यावरून चालताना, गाडी चालविताना देखील कानामध्ये हेडफोन्स लावून लोक मोबाईल फोनवर बोलत असतात, गाणी ऐकत असतात. इअरफोन्स कानामध्ये घालून मोठ्याने गाणी ऐकल्याने श्रवणदोष उत्पन्न होतातच पण त्याशिवाय मोबाईल फोनद्वारे उत्सर्जित घातक किरणांमुळे देखील कायमस्वरूपी श्रवणदोष निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मोबाईल फोनचा वापर करताना सलग एक ते दोन तास वापर करणे टाळावे. त्याचप्रमाणे सलग काही तास फोनवर ई-बुक्स वाचणे डोळ्यांसाठी अपायकारक ठरू शकते. विशेषतः काही व्यक्तींना अंधारामध्ये मोबाईल फोनवर चित्रपट पाहण्याची किंवा ई-बुक्स वाचण्याची सवय असते. अश्यावेळी मोबाईल फोनच्या स्क्रीनच्या प्रखरतेमुळे ( ब्राईटनेस ) आणि किरणोत्सर्गामुळे डोळे शुष्क होऊ शकतात, लाल होऊन त्यामधून सतत पाणी येऊ लागते. कालांतराने दृष्टीदोष निर्माण होऊ शकतात.

मोबाईल फोन अधिक आकर्षक दिसावा म्हणून त्यामध्ये विशेष प्रकारचे चमकदार धातू वापरले जातात. ह्यामध्ये निकेल, क्रोमियम, कोबाल्ट सारख्या धातूंचा समावेश आहे. हे धातू त्वचेसाठी हानिकारक असून, ‘सेल फोन डर्माटायटीस ‘ सारख्या त्वचारोगांसाठी कारणीभूत ठरू शकतात. आपल्या मोबाईल फोन वर अनेक जीवाणूंचा सतत प्रादुर्भाव होत असतो. विशेषतः ज्या लोकांना आपले मोबाईल फोन बाथरूमपासून ऑफिस किंवा कॉलेज कॅन्टीन पर्यंत सगळीकडे वापरण्याची सवय असते, त्यांच्या मोबाईलफोन वर मोठ्या प्रमाणामध्ये किटाणू आढळून येतात. ह्या किटाणूंमुले अनेक तऱ्हेच्या लहान मोठ्या व्याधी उत्पन्न होऊ शकतात. आरोग्यासाठी संतुलित आहार, स्वच्छता, आवश्यक व्यायाम ह्या गोष्टींची जशी आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे मोबाईल फोन सतत वापरण्याची सवय देखील बदलली जाणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment