रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान मोदींना जाहीर

award
रशियाने त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अॅपोसल यंदाच्या वर्षासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर केला आहे. भारतातील रशियन दुतावासाने या संदर्भात शुक्रवारी घोषणा केली असून हा सन्मान रशियाबरोबरचे संबंध अधिक मजबूत बनविण्यासाठी ज्या अंतरराष्ट्रीय नेतृत्वाने महत्वाचे योगदान दिले आहे त्यांना दिला जातो. मोदी यांना हा पुरस्कार त्यांनी भारत आणि रशिया यांच्यातील रणनीतिक भागीदारी संबंध अधिक मजबूत करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल दिला जात असल्याचे दुतावासाने जाहीर केले आहे.

रशियन झार शासकांनी १६९८ मध्ये या पुरस्काराची सुरवात विशेष पुरस्कार म्हणून केली होती. मात्र अलीकडेच रशियन नसलेल्यांना हा सन्मान देण्याची परंपरा सुरु करण्यात आली. मोदी यांच्यापूर्वी हा सन्मान चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, कजाकिस्तानचे राष्ट्रपती नजार बसेव, राष्ट्रपती हैदर अलीयेव यांना दिला गेला आहे.

nmodi
विशेष म्हणजे युएइने त्याच्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान, जायेद मेडल नरेंद्र मोदी यांना नुकतेच दिले आहे. मोदी यांना यापूर्वीही अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान दिले गेले असून त्यात ऑक्टोबर २०१८ मध्ये दक्षिण कोरिया सरकारचा सोल पीस पुरस्कार (आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील मोदींचे योगदान याबद्दल), सप्टेंबर २०१८ मध्ये युएस चँपियन ऑफ द अर्थ हा संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण क्षेत्रासाठीचा पुरस्कार, पॅलेस्टीनी सरकारचा ग्रांड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टीन, तसेच अफगाणिस्थान सरकारचा अमीर अब्दुल्लाहखान पुरस्कार यांचा समावेश आहे.

मोदी पॅलेस्टीन भेटीवर जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले होते. ते पॅलेस्टीन भेटीवर गेले असताना त्यांना हा सर्वोच्च पुरस्कार दिला गेला होता तसेच काबुल भेटीच्यावेळी राष्ट्रपती अश्रफ अब्दुल गनि यांनी अफगाणिस्थानचा सर्वोच्च पुरस्कार मोदी यांना दिला होता. याच वर्षात किंग अब्दुल्ला अझीझ सॅश पुरस्कारही मोदींना दिला गेला असून तो यापूर्वी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, इंग्लंडचे माजी पंतप्रधान कॅमेरून, रशियाचे राष्ट्रपती पुतीन आणि जपानचे पंतप्रधान शिन्जो अबे यांना दिला गेला आहे.

Leave a Comment