गुगलने सुरु केली जगातील पहिली व्यावसयिक ड्रोन सेवा

canberra
ड्रोनच्या माध्यमातून सामान पोहोचविण्यासाठी जगभरातील कंपन्या रेस करत असून त्यासाठी हजारो चाचण्या घेण्याचे काम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक ड्रोनसेवा सुरु करण्याची परवानगी मिळविण्यात अमेरिकन कंपनी गुगलने बाजी मारली असून त्यांना ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे ही सेवा सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. गुगल विंग कॅनबेरामधील १०० घरांना खाण्याचे पदार्थ, कॉफी, औषधे आता या सेवेच्या माध्यमातून पोहोचवित आहे. वास्तविक २०१४ पासून गुगल याच्या चाचण्या घेत असून या चाचण्याकाळात ३ हजार पार्सल ग्राहकांना पोचविली गेली आहेत. या चाचण्या काळात कंपनीने नागरिकांच्याकडून कोणत्या तक्रारी येत आहेत याच्या नोंदी घेऊन त्यानुसार सेवेत सुधारणा केल्या आहेत. उदाहरण द्यायचे तर सुरवातीला लोकांनी ड्रोनचा जादा आवाज येतो अशी तक्रार करून त्याविरोधात सोशल मिडीयावर मोहीम सुरु केली होती. त्याची दखल घेऊन गुगलने त्यात सुधारणा करून आवाज पातळी कमी करण्यासाठी खास प्रयत्न केले. भविष्यात अधिक चांगली सेवा मोठ्या प्रमाणावर देण्यासाठी अन्य शहरांचा विचार केला जाणार असल्याचे गुगलने स्पष्ट केले आहे.

गुगलला सध्या कॅनबेरा मध्ये सेवा देताना ४ कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा व्यवसाय मिळाला असून २०३० पर्यंत ऑस्ट्रेलियात २५ टक्के डिलिव्हरी ड्रोनच्या माध्यमातून दिल्या जातील असे सांगितले जात आहे. अमेझोन, अलिबाबा यांनीही ड्रोन सर्व्हिसवर काम सुरु केले आहे. त्यांनी ब्रिटन, अमेरिका आणि चीन मध्ये त्यासाठी चाचण्या सुरु केल्या आहेत. अर्थात ड्रोन सेवेसाठी काही नियम बनविले गेले असून त्यानुसार रस्ते तसेच गर्दीच्या रहिवासी भागावरून ड्रोन उडू शकणार नाहीत. सोमवार ते शनिवार सकाळी सात ते रात्री आठ तर रविवारी सकाळी ८ ते रात्री आठ या वेळातच ही सेवा देता येणार आहे. ड्रोन सेवा घेणाऱ्या ग्राहकाचा पत्ता जीपीएसच्या सहाय्याने फीड केला जाणार असून पार्सल दोरीने बांधलेले असेल. ग्राहकाच्या बागेत अथवा घराच्या छतावर ड्रोन पार्सल टाकेल आणि परत फिरेल असे नियम त्यात अंतर्भूत आहेत.

Leave a Comment