पप्पू कलानीच्या शिक्षामाफीचा अर्ज शासन समितीने फेटाळला

pappu-kalani
कल्याण : शासन समितीने उल्हासनगर शहर आणि ठाणे जिल्ह्याला एकेकाळी हादरवून सोडणारा कुख्यात डॉन सुरेश उर्फ पप्पू कलानी याचा शिक्षा माफ करण्याचा अर्ज फेटाळून लावल्यामुळे त्याला आता आयुष्यभर जेलमध्येच राहावे लागणार आहे.

सध्या खुनाच्या गुन्ह्यात पप्पू कलानी हा मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात वयाच्या सत्तरीत असलेला पप्पू कलानी आहे. पप्पू याला 1990 साली झालेल्या इंदर भटीजा हत्याप्रकरणात मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने यात 1990 ते 1997 आणि त्यानंतर 2019 ते 2019 अशी एकूण साडेतेरा वर्ष कारागृहात घालवली आहेत.

त्याला सत्र न्यायालयाने सुनावलेली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयानेही कायम ठेवली. पण कारागृहातील वर्तणूक चांगली असल्यास 14 वर्ष शिक्षा भोगल्यानंतर शिक्षा माफ करून कैद्याची मुक्तता करण्याची सरकारी तरतूद असल्यामुळे आपली शिक्षा माफ करण्याची मागणी आता येरवडा कारागृहाच्या अधीक्षकांच्या माध्यमातून पप्पू कलानीने सरकारी समितीकडे केली होती.

पण यावर मृत इंदर भटीजा यांचे भाऊ कमल भटीजा यांनी हरकत घेतली. गंभीर स्वरुपाचे 65 गुन्हे पप्पू कलानी याच्यावर दाखल असून त्याची सुटका झाली, तर आपल्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती भटीजा यांनी व्यक्त केल्याने कलानी याचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.

पप्पू कलानी हा माजी आमदार असून त्याची पत्नी ज्योती कलानी या उल्हासनगरच्या राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार आहेत. मुलगा ओमी कलानी यांची टीम ओमी कलानी भाजपच्या दावणीला असून सून पंचम ओमी कलानी या उल्हासनगरच्या महापौर असल्यामुळे राजकीय वजन वापरून पप्पूच्या परतीचा मार्ग मोकळा करण्याचा कलानी परिवाराचा प्रयत्न होता. पण कलानी याला आता संपूर्ण आयुष्य कारागृहातच घालवावे लागणार आहे.

Leave a Comment