धनंजय मुंडेंनी आपली सभा मनसे कार्यकर्त्याला श्रद्धांजली म्हणून केली रद्द

dhananjay-munde
परळी – विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची काल रात्री आठ वाजता बीड लोकसभा मतदारसंघातील परळी शहरात गणेशपार या नावाजलेल्या भागात जाहीर सभा होती. अनेक पक्षांची गणेशपार भागात सभा घेतली की विजय निश्चितच होतो अशी धारणा असल्यामुळे येथील सभा ही महत्त्वाची समजली जाते. त्यात मुंडेंचे परळी हे होमग्राउंड असल्याने ते लोकप्रियही आहेत आणि त्यांना ऐकायला मोठ्या प्रमाणावर गर्दीही जमली होती.

सभेला जवळपास दोन तास आधीच संध्याकाळी सहा वाजताच गर्दी झाली होती, पण मुंडे यांचे आगमन साडे नऊ वाजता झाल्यानंतर त्यांनी व्यासपीठावर येऊन चक्क ही सभा रद्द केल्याचे जाहीर करून आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी सूत्रसंचालकाच्या हातातील माईक ताब्यात घेत माफ करा मला, आज येथे मी भाषण करायला आलेलो नाही, पुन्हा कधीतरी नक्कीच येईन असे सांगितले. मला आज तुमच्याशी बोलण्यापेक्षा एका गोष्टीचे वाईट वाटत आहे की काही तासांपूर्वीच या भागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक सच्चा कार्यकर्ता वैजनाथ दहातोंडेचे दुःखद निधन झाले आहे.

वैजनाथ हा एक तरुण आणि सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करणारा माझा चांगला मित्र होता. पक्ष कोणताही असला तरी शहरातील सामाजिक चळवळ जिवंत राहण्यासाठी अशा कार्यकर्त्यांचे मोठे योगदान असते. वैजनाथ आणि त्याचे कुटुंबीय दुःखात असताना मला सभा घेणे योग्य वाटत नाही म्हणून वैजनाथला आपण सर्वजण श्रद्धांजली वाहू या असे सांगत मुंडेंनी वैजनाथ यांना श्रद्धांजली वाहिली.

Leave a Comment