नवी दिल्ली – अमेठी मतदारसंघातून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी निवडणूक लढवत असून निवडणूक आयोगाकडे त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. दिल्ली विद्यापीठातून आपण पदवी पूर्ण केली नसल्याचे यामध्ये स्पष्ट केले आहे. इराणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना १९९१ मध्ये दहावी व १९९३ मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे नमूद केले आहे. इराणी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या ओपन लर्निंगच्या माध्यमातून तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला नसल्याचे म्हटले आहे. अमेठी मतदारसंघात राहूल गांधी यांच्याविरोधात इराणी निवडणूक लढवत आहेत.
स्मृती इराणींची पदवीधारक नसल्याची कबुली
इराणी यांनी गेल्या निवडणुकीमध्ये प्रतिज्ञापत्रामध्ये पदवीधारक असल्याचे म्हटल्याचा दावा विरोधकांनी केला होता आणि त्यावरून गदारोळ उडाला होता. विरोधकांनी इराणी पदवीधारक नसून त्यांनी ही माहिती खोटी दिल्याचा आरोप केला होता. प्रतिज्ञापत्रात इराणी यांनी आपली मालमत्ता ४.७१ कोटी रुपयांची असल्याचे नमूद केले आहे. इमारत व जमीन या स्वरूपात २.९६ कोटी रुपयांची तर ठेवी व रोख रकमेच्या व अन्य स्वरूपात एक कोटी ७५ लाख रुपयांची संपत्ती असल्याचे इराणी यांनी म्हटले आहे.
१३ लाखांची गाडी व २१ लाखांचे दागिने इराणी यांच्याकडे आहेत. कुठलाही गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल नसून त्यांच्या डोक्यावर कर्जही नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. इराणी यांचे पती झुबिन यांच्याकडेही पाच कोटी रुपयांच्या आसपास संपत्ती असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.