स्वराजरक्षक संभाजी मालिकेसाठी अमोल कोल्हेंनी विकले स्वतःचे घर

amol-kolhe
अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या घराबद्दलचा वाद चव्हाट्यावर आला आहे. अमोल कोल्हेंनी घर विकले नसल्याचे म्हणत, अमोल कोल्हे श्रीमंत व्यक्ती असल्याचे शिवसेनेने म्हटले. आता मालिकेचे दिग्दर्शक कार्तिक केंढे यांनीच या वादात उडी घेतली आहे. तसेच, केंढे यांनी एका घटनेचा उल्लेख करताना, परळमधील घर अमोलने मालिकेसाठीच विकल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेचा मी स्वत: साक्षीदार असल्याचेही त्यांनी आपल्या पत्रातून म्हटले आहे.

आरोप-प्रत्यारोपांची मालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत सुरू झाली आहे. स्वराजरक्षक संभाजी मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका निभावणाऱ्या अमोल कोल्हेंबाबत त्यातून उलट-सुलट चर्चा होत आहेत. निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर, जर कोल्हेंची संपत्ती 5 कोटी रुपये आहे, तर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिकेसाठी मग त्यांनी घर गहाण ठेवल्याची अफवाच, असे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटले होते. कोल्हेंना या प्रकरणावरुन ट्रोलही करण्यात आले. पण कोल्हे समर्थकांनीही याबाबत पत्राद्वारे खुलासा केला होता. आता मालिकेचे दिग्दर्शक कार्तिक केंढे यांनीही या वादात खुले पत्र लिहून अमोल कोल्हेंनी घर विकल्याचे समर्थन केले. तसेच ही घटना माझ्यासमोरच घडल्याचा प्रसंगही त्यांनी सांगितला.

ह्या मालिकेचे जेव्हा ९ जाने ते २० जाने २०१७ रोजी पहिले चित्रीकरण करून, आपण सगळे मुंबईला आलो आणि आपल्याला संबंधित वाहिनी कडून २१ जाने २०१७ रोजी सांगण्यात आले की आम्ही ही मालिका करणार नाही, तेव्हा पायाखालची जमिन सरकली होती, आपल्या संपुर्ण टीमची ७/८ वर्षांची मेहनत पाण्यात गेली, असे मला वाटले होते, संपुर्ण टीम युद्ध हारल्याप्रमाणे, शस्त्र खाली ठेऊन, खालमानेने, ह्या संकटातून बाहेर पडण्याचा विचार करीत होती, पण मित्रा, तू हारला नाहीस, संभाजी महाराजांवरील श्रद्धेमुळे तू, त्याही परिस्थितीत लढलास आणि परिस्तिथी बदललीस, मालिका पुन्हा सुरू केलीस, हाती पैसा नाही, होते फक्त स्वप्न….

परळ येथे घेतलेले घर हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तू कुठलाही विचार न करता विकलेस, तूझी गाडी विकायला ठेवलीस, आणि मालिकेचे चित्रीकरण सुरू केलेस, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगासमोर आणण्याठी तू केलेली मेहनत, तू केलेला अभ्यास आणि तू केलेला त्याग, ह्या सगळ्याचाच मी साक्षीदार आहे…असे कार्तिक केंढे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे अमोल कोल्हेंनी घर विकल्याची बातमी खरी असल्याच्या घटनेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

Leave a Comment