बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याने आपल्या 22 सुपरहिट चित्रपटांचे सॅटेलाइट हक्क कोट्यवधी रुपयांना विकले आहेत. गेल्या दोन वर्षांत शाहरूखचे प्रदर्शित झालेले चित्रपट फ्लॉप गेले. त्याचबरोबर त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’लाही प्रेक्षकांनी सपशेल नाकारले होते. सध्याच्या घडीला शाहरुख कोणत्याही चित्रपटात काम करत नसतानाही त्याने एका खासगी वाहिनीला आपल्या सुपरहिट चित्रपटांचे सॅटेलाईट हक्क विकले आहेत. त्यामुळे त्याला प्रचंड कमाई झाली असल्याचे वृत्त आहे.
22 सुपरहिट चित्रपटांचे हक्क शाहरुखने विकले
‘चमत्कार’, ‘पहेली’, ‘डिअर झिंदगी’, ‘ओम शांती ओम’, ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’, ‘राम जाने’, ‘हॅपी न्यू इअर’, ‘स्वदेश’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटांचा या २२ चित्रपटांमध्ये समावेश आहे. खासगी वाहिनीवर हे २२ चित्रपट पाहायला मिळणार आहेत. शाहरूखचे ‘चेन्नई एक्स्प्रेस’नंतर कोणतेही चित्रपट सुपरहिट ठरले नाही. अलीकडच्या काळात शाहरूखचे प्रदर्शित झालेले चित्रपट आदळले असले तरी त्याच्या जुन्या चित्रपटांची जादू अजूनही कायम आहे. या चित्रपटांचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे म्हणूनच चित्रपटांचे सॅटेलाइट हक्क विकण्याचा निर्णय शाहरुखने घेतला.
शाहरूखने ‘झिरो’च्या अपयशानंतर कोणत्याही चित्रपटाची ऑफर अद्याप स्वीकारलेली नाही. शाहरूख अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकमध्ये दिसणार अशा चर्चा होत्या पण या चित्रपटाबद्दल शाहरूख मौन बाळगून आहे. शाहरूख ऐवजी या चित्रपटात विकी कौशलची वर्णी लागू शकते अशा चर्चा आहेत.