उदयनराजेंना पाडण्यासाठी चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांसाठी खास उपाय

chandrakant-patil
सातारा : महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी साताऱ्यातील वाई येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना रात्री घरी जाताना एक खडू घेऊन जा आणि धनुष्यबाणाचे चिन्ह आपल्या घरातल्या भिंतीवर काढा, त्याच्याखाली ‘उदयनराजे हरू शकतात, मी त्यांना हरवणारच’ असे लिहा मग बघा कशी एनर्जी येते असा सल्ला दिला आहे.

‘उदयनराजे हरू शकतात, मी त्यांना हरवणारच’ असे घरातल्या भिंतीवर पुसल्या जाणाऱ्या खडूने लिहायचे आणि घरातून बाहेर पडताना रोज भाजप आणि शिवसेनेचा बॅच खिशाला लावूनच घराबाहेर पडायचे, असा खास उपाय उदयनराजेंना पाडण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितला. चंद्रकांत पाटील यांनी या वेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही टोला लगावला. शरद पवार शेवटच्या दिवशी बारामतीत सभा घ्यायचे आता तेच शरद पवार आपल्या पोरीसाठी मतदारसंघात चार-चार सभा घेत असल्याचे ते म्हणाले.

शिवसेनेकडून सातारा मतदारसंघातून माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना उदयनराजे यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे नरेंद्र पाटील पुत्र आहेत. नरेंद्र पाटील यांची सातारा, वाई, कोरेगाव, पाटण येथे माथाडी मतदारांवर पकड आहे. मराठा मोर्चे निघाला होते, त्यात सातारा पट्ट्यातील लोकांचा सर्वाधिक समावेश होता. त्यामुळे नरेंद्र पाटील यांना ही मते मिळतील अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment