नेटकरी गुगलवर शोधत आहेत मतदानाची शाई घालवण्याचे फंडे

google
देशभरात आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. पहिल्या टप्प्यात 91 मतदारसंघात मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यामधील मतदानामध्ये महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघामध्येही मतदान होत आहे. पण मतदान केल्यानंतर लावली जाणारी शाई घालवायची कशी यासंदर्भातील माहिती आज गुगलवर सर्वाधिक सर्च केली जात आहे.

गुगल ट्रेण्डसवरील माहितीनुसार ‘How to remove vote ink’ या टर्मच्या सर्चचे प्रमाण ९ एप्रिलपासूनच वाढले आहे. त्याचबरोबर आज पहाटे साडेचार वाजल्यापासूनच मतदान केल्यानंतर बोटावरील शाई कशी काढावी यासंदर्भात भारतातून होणाऱ्या सर्चच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. भारतीयांनी आज सकाळी दहा वाजल्यापासूनच मोठ्या प्रमाणात ‘How to remove vote ink’ सर्च करण्यास सरुवात केल्याचे गुगल ट्रेण्डसवर दिसत आहे. मोठ्याप्रमाणात यासंदर्भातील गुगल सर्च सकाळी दहा ते बारा या दोन तासांमध्ये झाले असले तरी हे प्रमाण दुपारनंतर अचानक वाढल्याचे या आलेखामध्ये दिसत आहे.

दक्षिणेतील राज्ये बोटांवरील शाई कशी काढावी यासंदर्भात सर्च करणाऱ्या राज्यांमध्ये आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. शाई काढण्यासंदर्भात गुगल सर्च करणाऱ्यांचे प्रमाण आंध्रप्रदेश, तेलंगण, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. दक्षिणेतील राज्यांमध्ये शाई काढण्यासंदर्भातील सर्चमध्ये वाढ होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे आज पहिल्या टप्प्यामध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील सर्व लोकसभा जागांवर मतदान होत आहे. निवडणूक आयोगाने बोगस मतदान होऊ नये यासाठी अनेक उपाय योजना केल्या असल्या तरी हातावरील शाई काढण्याची घाई मतदारांना लागल्याचे चित्र सध्या तरी गुगल ट्रेण्डमधून समोर येत आहे.

Leave a Comment