पत्नीचा पती दाढी आणि आंघोळ करत नाही म्हणून घटस्फोटासाठी अर्ज

divorce
भोपाळ : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी दाढी ठेवायला सुरुवात केल्यापासून आपल्याकडे सध्या दाढी ठेवण्याचे जाणू काही ट्रेंडच सुरु झाले आहे. आताच्या घडीला महाविद्यालयीन तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण मोठी दाढी वाढवून ‘माचो’ लूकमध्ये फिरत असल्याचे आपल्या निदर्शनास पडत आहे. पण मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याचा संसार या दाढीने घटस्फोटापर्यंत नेऊन ठेवला आहे.

भोपाळमध्ये राहत असलेल्या एका सिंधी तरुणाने तीन वर्षांपूर्वी ब्राह्मण तरुणीशी लग्न केले. दोघांनी वर्षभर सुखी संसार केला. पण नवऱ्याने त्यानंतर दाढी वाढवली. पत्नीला त्याची ही दाढी खटकू लागली. दोघांमध्ये या दाढीमुळे वादाची ठिणगी पडली. नवरा दाढी करत नाही, थंडी असल्याचे कारण पुढे करुन आंघोळ करत नाही, परफ्यूम लावून अंगाला येणारा दुर्गंध लपवण्याचा प्रयत्न करतो, या महिलेने या कारणांवरून नवऱ्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्फोटासाठी तिने अर्जदेखील दाखल केला आहे.

नवऱ्याने बायकोच्या घटस्फोट अर्जानंतरही माघार घेतलेली नाही. आपल्या बायकोपेक्षा या माणसाला त्याची दाढीच अतिप्रिय आहे. कारण या विचित्र माणसाने काहीही झाले तरी दाढीला ब्लेड लावणार नसल्याचे स्पष्ट उत्तर न्यायालयात दिले आहे. मी कसे जगायचे, काय करायचे, हे मी ठरवेन, मला बायकोने या गोष्टी सांगायची गरज नसल्याचे म्हणत पतीने अधिकाऱ्यांसमोरच पत्नीला सुनावले आणि मी बदलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment