बीड : शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा प्रचार करणार असल्याचे कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केले आहे. भाजपसोबत देशात आणि राज्यात असणार, पण बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे विनायक मेटेंनी सांगितले आहे.
विनायक मेटे करणार बीडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार
शिवसंग्राम बीड जिल्ह्यात भाजपचे काम करणार नाही, पण राज्यात इतर ठिकाणी भाजपसोबत असेन, अशी भूमिका विनायक मेटेंनी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जाहीर केली होती. पण अशी भूमिका चालणार नसल्याचा दम भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भरला. पण विनायक मेटे तरीही मागे हटले नाहीत. आज शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा घेऊन, बीडमध्ये बजरंग सोनवणे यांचा प्रचार करणार असल्याची घोषणा मेटेंनी केली.
विनायक मेटे यांनी आपल्या संपूर्ण भाषणात पंकजा मुंडेंवर कडाडून टीका केली. जनावरांच्या छावण्यात राजकारण करणारे हे मुंडे साहेबांचे वारस असू शकत नाहीत. तसेच पंकजा मुंडे यांनी साडेचार वर्षात तीन वेळा आपल्या मंत्रीपदाचा कसा विरोध केला याचा पाढाही त्यांनी वाचला. तर दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कसे चांगले आहेत. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी त्यांना इतर ठिकाणी साथ देणार असल्याचेही मेटेंनी जाहीर केले.