माता बगलामुखी कोणाला करणार विजयी, आणि कोणाचे करणार उच्चाटन?

bagalamukhi
भारतात लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून मतदान सुरु झाले आहे. निवडणुकीची नुसती चाहूल लागली की उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते, राजकीय नेते याची पावले आपोआप देव देवतांच्या दरबारी हजेरी लावण्यासाठी वळतात. त्यातही सिद्धक्षेत्रांच्या ठिकाणी ही गर्दी विशेष जाणविते. मध्यप्रदेशातील उज्जैनपासून ६० किमीवर असलेले नलखेडा सध्या असेच गजबजले आहे. येथील मा पितांबरा किंवा बगलामुखी माता मंदिरात सुर्योदयापासून हवन होम, आराधना करण्यासाठी देशभरातून अनेक राजकीय नेते हजेरी लावत आहेत. या देवीची आराधना मुख्यत्वे विजयासाठी आशीर्वाद घेण्यासाठी केली जातेच पण शत्रू किंवा विरोधी नेत्याचा नाश व्हावा म्हणूनही ती केली जाते असे समजते.

मंदिरात अनेक वर्षे पूजा करणारे पुजारी आत्माराम शर्मा सांगतात, आजकाल सूर्योदयापासून हवन करण्यासाठी नंबर लागले असून रात्रीसुद्धा हवन होम सुरु आहेत. येथे नेहमीच भाविकांची गर्दी असते पण निवडणूक काळात राजकीय नेते, उमेदवार मोठ्या संखेने येतात. देशविदेशात या मातेची कीर्ती मनोकामना पूर्ण करणारी आणि शत्रूचा नाश करणारी अशी आहे. त्यातून सध्या नवरात्र सुरु असल्याने अधिक गर्दी होते आहे. राजकीय नेते निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच मातेच्या दरबारी हजेरी लावत आहेत. काही जणांना त्यांची ओळख जाहीर होऊ द्यायची नसते ते त्यांचे प्रतिनिधी पाठवून पूजा संकल्प करतात.

bagala1
बगलामुखी हे त्रिशक्तीचे स्वरूप असून फक्त येथेच अशी मूर्ती आहे. यात मध्ये बगला, उजवीकडे महालक्ष्मी आणि डावीकडे महासरस्वती आहेत. भारतात तीन ठिकाणी अशी मंदिरे आहेत. त्यातील एक मध्यप्रदेशातील दतिया येथे तर दुसरे हिमाचल मध्ये आहे. मध्यप्रदेशाच्या नलखेडा येथील हे मंदीर द्वापार युग काळातले आहे असे सांगतात. हे मंदिर स्मशानाच्या मध्यभागी असून येथे शैव आणि शाक्तमार्गी साधू तंत्र अनुष्ठाने करतात तसेच सर्वसामान्य भाविकही येथे दर्शनाला येतात.

असे सांगतात की दशमहाविद्यातील ही आठवी महाविद्या आहे. तिला पितांबरा असेही म्हणतात. हे स्तंभन देवी असून शत्रूचा नाश, वाकसिद्धी, वादविवाद विजयासाठी तिची आराधना केली जाते. यामुळे शत्रू विनाश होतो. मंदिरातील मूर्ती स्थापनेचा इतिहास अज्ञात आहे मात्र ही मूर्ती ५ हजार वर्षे जुनी असल्याचे मानले जाते. पांडव जेव्हा संकटात होते तेव्हा कृष्णाने येथेच त्यांना उपासनेसाठी पाठविले होते. युधिष्ठिराने लक्ष्मणा म्हणजेच सध्याच्या लखुंदर नदीकाठी देवीची आराधना केली आणि कौरवांवर विजय मिळविला असे सांगितले जाते. या देवीला पिवळी फुले, फळे, मिठाई, तसेच पिवळ्या रंगाची वस्त्रे वाहण्याची प्रथा आहे.

Leave a Comment