आपले संसदभवन प्राचीन योगिनी मंदिराची प्रतिकृती

parliament
नव्या लोकसभेसाठी देशात आता मतदानाची सुरवात झाली आहे. निकाल जाहीर होतील तेव्हा कोण कोण नवे खासदार संसदेत येतील, जुने जाणते कोण खासदार असतील हे स्पष्ट होईलच. संसदेत कोण पोहोचणार याची उत्सुकता केवळ लोकसभा उमेदवारांना नसेल तर ती मतदारानाही असणार. आपल्या संसद भवनची इमारत देखण्या वास्तूपैकी एक मानली जाते आणि ब्रिटीश वास्तुरचनाकार सर एडविन लुटीयन्स यांनी तिचे डिझाईन केले हे आपण जाणतो. पण लुटीयन्स यांनी हे डिझाईन बनविताना भारतातील एका अति प्राचीन मंदिरावरून प्रेरणा घेतली होती याची माहिती अनेकांना नाही. कारण कागदोपत्री तसा कुठेही उल्लेख नाही तसेच संसद भवनाच्या वेबसाईटवर त्या संदर्भात माहिती दिली गेलेली नाही.

yogini
हे मंदिर आज उपेक्षेची शिकार बनले आहे. मध्यप्रदेशातील मुसैना जिल्ह्यात ग्वाल्व्हेर पासून ४० किमीवर असलेले हे मंदिर चौसष्ठ योगिनी मंदिर अथवा इंकतेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते. सरकारने हे मंदिर ऐतिहासिक स्मारक म्हणून घोषित केले आहे पण आजही ते दुर्लक्षित आहे. हे मंदिर क्षत्रिय राजानी १३ व्या शतकात बांधले असे मानले जाते तर पुरातत्व विभागाच्या म्हणण्यानुसार ते ९ व्या किंवा १० व्या शतकातील आहे. पूर्वी हे मंदिर तांत्रिक विश्वविद्यालय म्हणून प्रसिद्ध होते आणि देश विदेशातून येथे तांत्रिक येत असत. भारतात ४ योगिनी मंदिरे असून त्यातील दोन ओडीसा मध्ये तर दोन मध्यप्रदेशात आहेत. त्यातील हे सर्वात महत्वाचे आणि प्राचीन आहे.

chausshth
आज या मंदिरात जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. मंदिराचा आकार गोलाकार असून त्यात ६४ खोल्या आहेत. प्रत्येक खोलीत एक शिवलिंग आहे. पूर्वी या शिवलिंगाबरोबर एक एक योगिनी मूर्ती होती. मध्यावर मोठा खुला मंच असून तेथेही मोठे शिवलिंग आहे. हे मंदिर १०१ खांबांवर उभे आहे. जमिनीपासून ३०० फुट उंचीवर हे मंदिर असून तेथे जाण्यासाठी २०० पायऱ्या चढून जावे लागते. योगिनी मूर्तींपैकी काही चोरीला गेल्या आहेत तर बाकीच्या दिल्ली संग्रहालयात आहेत.

विशेष म्हणजे हे मंदिर आणि आपले संसद भवन केवळ बाहेरून नाही तर आतूनही खांबांची रचना सारखी असलेले आहे. हे मंदिर तंत्रविद्येचे स्थान होते त्यामुळे आजही येथे रात्री मुक्काम करता येत नाही. माणसेच काय पण पक्षीहि रात्री येथे राहत नाहीत असे सांगितले जाते. या योगिनी म्हणजे माता काली आदिशक्तीचा अवतार मानल्या जातात. घोर नावाच्या दैत्याशी युद्ध करताना कालीमातेने हे अवतार धारण केले होते असे सांगितले जाते.

Leave a Comment