प्राचीन मूर्तींना नुकसान पोहोचवल्या प्रकरणी सलमानला पुरातत्व विभागाची नोटीस

salman-khan
भारतीय पुरातत्व विभागाने सलमान खानला त्याच्या ‘दबंग ३’ या चित्रपटाच्या शूटिंगवरून नोटीस बजावली असून पुरातत्तव विभागाने चित्रपटासाठी मध्य प्रदेशच्या मांडू येथे ऐतिहासिक जल महालात उभारलेले दोन सेट तात्काळ हटविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन निर्मात्यांनी न केल्यास चित्रिकरण रद्द केले जाईल, असेही या नोटीशीमध्ये सांगण्यात आले आहे.

या संदर्भातील वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले असून त्यांना दिलेल्या वृत्तानुसार, निर्मात्यांना याआधीच पुरातत्व विभागाने बजावले होते पण या सूचनेकडे त्यांनी दुर्लक्ष केले. सेट संबंधित ठिकाणी उभारून प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळ व अवशेष कायदा १९५८च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका या नोटीसमध्ये ठेवण्यात आला आहे. नर्मदा नदीजवळच्या किल्ल्यातील प्राचीन मूर्तींना ‘दबंग ३’ चित्रपटाच्या टीमने नुकसान पोहोचवल्याचा आरोपही नोटीसमध्ये करण्यात आला आहे. किल्ल्यातील सेट हटविताना तेथील प्राचीन मूर्तींना अंशत: नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे.

मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री विजयलक्ष्मी साधो याप्रकरणी म्हणाल्या, चित्रपटाच्या शूटिंगसाठी आम्ही परवानगी पर्यटन विकास व्हावा यासाठी दिली होती. पण चित्रिकरणादरम्यान तेथील प्राचीन मूर्तींना हानी पोहोचली असेल तर संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment