एरियल स्ट्राईकाचा पुरावा मागणाऱ्या वीरपत्नी देशविरोधी – विजय रुपानी

vijay-rupani
गांधीनगर – मंगळवारी गांधीनगर येथील पक्ष कार्यालयात केलेल्या भाषणात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोटवर भारतीय हवाई दलाने केलेल्या एरियल स्ट्राईकचा पुरावा मागणारे सर्वजण देशविरोधी आणि पाकिस्तानचे समर्थक आहेत. त्याचबरोबर बालाकोट स्ट्राईकचा पुरावा पुलवामा बॉम्ब हल्ल्यातील हुतात्म्यांच्या पत्नींनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जर मागितला, तर त्यादेखील देशविरोधी आणि पाकिस्तानीच असल्याचे धक्कादायक वक्तव्य विजय रुपानी यांनी केले आहे.

पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की, भारत आणि पाकिस्तान दरम्यान यावेळच्या निवडणुका होत आहेत का? कारण, एरियल स्ट्राईकचे पुरावे पाकिस्तान मागत आहे आणि हेच पुरावे काँग्रेस देखील मागत आहे. दोघांचीही भाषा एकच असल्याचे रुपानी म्हणाले. तेव्हा हवाई दलाच्या कारवाईवर आता जे कोणी संशय घेतील, ते सर्व पाकिस्तानलाच मदत करत आहेत. पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांनी एरियल स्ट्राईकचे पुरावे मागितले, तर त्यांनाही असेच म्हटले जाईल का, असे पत्रकारांनी रुपानी यांना विचारले असता, त्यांनी ताबडतोब होकार दिला. हो नक्कीच, आपल्या लष्करावर संशय घेणारा निश्चितच पाकिस्तानी असल्याचे ते म्हणाले.

भाजपचा निवडणूक जाहीरनामा ‘संकल्प पत्रा’च्या गुजराती भाषांतराचे उद्घाटन करताना केलेल्या भाषणात मुख्यमंत्री रुपानी यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘संकल्प पत्र ही नवीन भारत निर्माण करण्याची प्रतिज्ञा आहे. मागील पाच वर्षांत भारताने जगात चांगली ओळख निर्माण करण्याएवढी उंची गाठली आहे. मागच्या ५ वर्षांत मोदी सरकारने भ्रष्टाचाराविरोधात मोठा लढा दिला असल्याचे रुपानी यांनी म्हटले आहे.

देशाची सुरक्षा सर्वांत महत्त्वाची आहे. घुसखोरांना मागे हटवण्यासाठी आमच्या सरकारने सुरक्षा दलांना निर्णय घेण्याची आणि कारवाई करण्याची पूर्ण मोकळीक दिली आहे. आमचे सरकार दहशतवादाविरोधी कारवाईत कधीही तडजोड करणार नसल्याचेही ते म्हणाले. आम्ही कलम ३७० आणि कलम ३५ए रद्द करू. तसेच, राम मंदिरही बांधू, असेही रुपानी म्हणाले.

Leave a Comment