मोदींना विरोध करणाऱ्या कलाकारांविरोधात एकवटले 900 समर्थक कलाकार

narendra-modi1
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान करु नका असे आवाहन देशभरातील 600 कलाकारांनी एकत्र येऊन केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 907 कलाकार आणि साहित्यिकांनी एकत्र येत समर्थन केले आहे. देशातील नागरिकांना या कलाकारांनी भारतीय जनता पक्षालाच मत देण्याचे आवाहन केले आहे. आवाहन करताना कलाकारांनी म्हटले आहे की, आपल्याला मजबूर सरकार नको आहे, आपल्याला एक मजबूत सरकार हवे असल्याचे म्हटले आहे.

गायक-संगीतकार शंकर महादेवन, नाट्यकर्मी वामन केंद्रे, शिल्पकार राम सुतार, पंडित जसराज, अभिनेत्री कोयना मित्रा, अभिनेत्री पल्लवी जोशी, बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय, गायिका अनुराधा पौडवाल, गीतकार अभिजीत भट्टाचार्य, राहुल रॉय, विजयलक्ष्मी कृष्णन, संतूरवादक कमल गोएंका, अभिनेत्री सुश्मिता मुखर्जी आणि संगीतकार सुनिल कौशिक यांच्यासह 907 कलाकारांनी एक परिपत्रक जारी करुन त्याद्वारे भारतीय जनता पक्षाला मत देण्याचे आवाहन केले आहे.

उद्यापासून लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीला सुरुवात होत आहे. सध्याच्या घडीला सर्वत्र निवडणुकीचा फिव्हर पाहायला मिळत आहे. यामध्ये आपले कलाकारदेखील मागे नाहीत. विविध राजकीय नेत्यांचा प्रचार करताना अनेक कलाकार दिसत आहेत. त्याचबरोबर आता थेट मोठ्या संख्येने कलाकारांनी एकत्र येत लोकांना नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment