संजय गांधी यांच्या कथित कन्या प्रिया निवडणूक रिंगणात

singhpol
उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीशी फारकत घेऊन नवीन प्रगतीशील समाजवादी पार्टीची स्थापना करणारे मुलायमसिंग यांचे भाऊ शिवपालसिंग यांनी प्रतिष्ठेच्या आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या प्रयागराज मधील फुलपूर जागेवर संजय गांधी यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या प्रियासिंह पॉल यांना उमेदवारी देऊन अखिलेश आणि मायावती युतीला चांगलाच धक्का दिला आहे. प्रिया या मुळच्या गुरुग्रामच्या रहिवासी असून त्यांनी यापूर्वी केंद्रात अतिरिक्त डीजी म्हणून काम केले आहे. तसेच अनेक टीव्ही आणि चित्रपटासाठीही काम केले आहे. आपण नेहरू गांधी घराण्याच्या वंशज आहोत असा दावा त्यांनी केला असून त्यासंदर्भात दिल्ली न्यायालयात केस चालू आहे.

फुलपूर मतदारसंघातून प्रियांका गांधी यांनी निवडणूक लढावी अशी मागणी होत होती. प्रीयासिंह पॉल या त्यांच्या जन्मदाखल्यासाठी कायदेशीर लढा देत आहेत. आपण इंदिरा गांधी यांची नात आणि संजय गांधी यांची मुलगी आहोत असे त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी आपले डीएनए तपासले जावे अशी त्यांची मागणी आहे. भारतात पहिले बालरुग्णालय सुरु करणाऱ्या डॉ. शीलासिंह पॉल यांनी प्रिया यांना दत्तक घेतले होते. शिलासिंह यांच्या मृत्युनंतर प्रिया यांना माजी पंतप्रधान गुजराल यांच्या पत्नी विमला यांनी संजय गांधी हे त्यांचे खरे वडील असल्याचे सांगितले होते असे प्रिया यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या खऱ्या वडिलांचा शोध घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

प्रियासिंह म्हणतात त्यांना जेव्हा फुलपूर आणि प्रयागराज मतदारसंघातील कोणता हवा विचारले गेले तेव्हा त्यांनी फुलपूरची निवड केली कारण भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल येथून तीनवेळा विजयी झाले होते तसेच या शहराने देशाला स्वतंत्र मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहेच पण देशाला पंतप्रधान देण्याचा वारसा चालविला आहे. नेहरू गांधी घराण्याचा वारसा मला आहे त्यामुळे याच मतदारसंघाला पसंती देणे योग्य ठरले असते.

Leave a Comment