या मंदिराच्या पायऱ्यातून उमटतात सप्तसूर

chola2
तामिळनाडूच्या कुंभकोणम जवळ असलेल्या दारासुरम ऐरावतेश्वर मंदिरात कधी गेलात तर तेथे असलेल्या जिन्याचा समूह जरूर पहा. पूर्ण दगडात बांधलेल्या या जिन्यावर तुम्ही पायाने थोडा आघात केलात तर या पत्थरातून उमटणारे सप्तसूर तुम्हाला गीत गाया पत्थरोनेचा खास अनुभव देतील. शिवाला समर्पित असलेले हे मंदिर १२ व्या शतकातील असून राजराजा चोल दुसरा याच्या काळात बांधले गेले आहे. युनेस्कोने २००४ साली जागतिक वारसा यादीत ज्या चोल मंदिरांचा समवेश केला त्यातील हे एक मंदिर असून अन्य मंदिरे म्हणजे तंजावूरचे बृहदिश्वर मंदिर आणि गांगेयकोंडा चोलापुरमचे गांगेयकोंडा चोल मंदिर आहे.

chola1
या मंदिराची कथा अशी सांगतात की देवांचा राजा इंद्र याचे वाहन असलेल्या ऐरावत हत्तीने येथे शिवपूजा केली होती. ऐरावत हा पांढऱ्या रंगाचा हत्ती. दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे त्याचा रंग बदलला तेव्हा त्याने मंदिरातील पवित्र कुंडात स्नान करून शिवपूजा केली तेव्हा त्याला त्याचा मूळ रंग मिळाला. त्यामुळे या मंदिराचे नाव ऐरावतेश्वर असे पडले. या मंदिराचा कानाकोपरा अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. संपूर्ण दगडात बांधलेल्या या मंदिरात अनेक कोरीव शिल्पे असून येथे ८० फुट उंचीचे खांब आहेत. मंडपमच्या दक्षिण भागात दगडात कोरलेला रथ आणि दगडातच कोरलेली मोठी चाके असून हा रथ घोडे ओढत असल्याचे दाखविले गेले आहे.

chola
या मंदिराच्या आवारात कोरीव लेण्याचा जणू समूह आहे ज्याला बलीपीठ असे म्हटले जाते. येथे बळी दिला जात असे. याच आवारात एका दगडी खुर्चीवर एक छोटे मंदिर असून त्यात गणेश विराजमान आहेत. चौकीच्या दक्षिणेकडे संगीत वाजणाऱ्या जिन्याचा समूह आहे. दक्षिण पश्चिम कोपऱ्यात चार तीर्थ मंडप असून तेथे यमदेवाची मूर्ती आहे. मंदिर परिसरात अनेक शिलालेख आहेत. याच मंदिरात द्राविडीयन वास्तुशैलीतील एक दगडी खांब आहे. दगडावर केल्या गेलेल्या कोरीवकामात भरतनाट्यम नृत्यातील अनेक पोझ, रोजच्या जीवनातील प्रसंग, व्यायाम करणाऱ्या महिला, देवी देवता यांच्या मूर्ती आणि त्यांच्या कथा सांगणारे प्रसंग कोरले गेले आहेत.

Leave a Comment