महिंद्रा एकूणच दणकट एसयुव्ही साठी प्रसिद्ध कंपनी आहे. या दणकट गाड्यांच्या मालिकेतील अशीच एक दणकट मार्क्समन एसयुव्ही नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात सीआयएसएफच्या ताफ्यात दाखल झाली असून अश्या सहा गाड्या येथे तैनात केल्या गेल्या आहेत. अश्या बुलेटप्रुफ गाड्यांचा ताफा हद्दीत असणारा हा देशातील पहिलच विमानतळ बनला आहे. या गाड्या केवळ बुलेट प्रुफ नाहीत तर हलके लढाऊ वाहन म्हणूनही उपयोगात येणार असून या गाड्यांच्या किमती २५ लाखांपासून सुरु होतात असे समजते.
महिंद्राच्या दणकट मार्क्समन बुलेटप्रुफ एसयूव्ही
ही ऑफरोड एसयूव्ही अनेक मस्त फीचर्स सह असून वास्तविक ती २००९ साली सादर केली गेलेली आहे. पण कालानुरूप त्यात अनेक आवश्यक आणि नवीन बदल केले गेले आहेत. २०१० मध्ये या गाड्या सर्वप्रथम मुंबई पोलीस ताफ्यात सामील केल्या गेल्या आणि नंतर त्या देशात तसेच विदेशात विविध संस्थानी त्यांच्या ताफ्यात घेतल्या आहेत. ही सहा सीटर गाडी लोकप्रिय स्कोर्पियोच्या प्लॅटफॉर्मवर बनविली गेली आहे.
ही गाडी बुलेटप्रुफ आहेच पण एके ४७ पेक्षा खतरनाक रायफल हल्ल्यापासून सुद्धा ती आतील जवानांचे संरक्षण करू शकते. आग, ग्रेनेड हल्ल्याचा तसेच भूसुरुंगांचा तिच्यावर परिणाम होत नाही. २६०० किलो वजनाच्या या गाडीला डीझेल साठी २.२ लिटरचे तसेच २.६ लिटरचे अशी दोन इंजिन ऑप्शन आहेत. दोन्हीला ७ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन, फोर व्हील ड्राईव्ह ऑप्शन असून या गाड्यांचा वापर प्रामुख्याने कौंटर टेररिस्ट ऑपरेशन, पेट्रोलिंग, सेनेच्या खास मोहिमा, क्विक रिस्पोन्स टीम, सेनेचे काफिले, दंगे नियंत्रण यांच्यासाठी होतो.