खादाड पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर भडकला अक्रम

wasim-akram
इंग्लंड आणि वेल्स येथे ३० मे पासून विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगणार आहे. सारे संघ या स्पर्धेसाठी कसून परिश्रम करत असून सर्वच आपल्या तंदुरुस्तीवर आणि शारीरिक स्वास्थ्यावर विशेष लक्ष देत आहेत. पण पाकिस्तानच्या खेळाडूंना या दरम्यान अजूनही बिर्याणीचा खुराक देण्यात येत असल्याने पाकचा माजी कर्णधार वसीम अक्रमचा पारा चांगलाच चढला आहे.

काही दिवसात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ आपला पहिला सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत त्यामुळे आता त्यांना विशेष लक्ष द्यायला हवे. पण अजूनही बिर्याणी आणि त्या प्रकारचा आहार करण्यात पाकिस्तानचे खेळाडू मग्न आहेत. अशा पद्धतीचा खुराक सुरु राहिला, तर विश्वचषकात इतर संघांशी पाकिस्तानचे खेळाडू दोन हात कसे करणार? असा सवाल अक्रमने विचारला आहे.

भारत आणि इंग्लंड या २ संघाना विश्वचषक स्पर्धेत क्रिकेटमधील जाणकार विजेते म्हणून पसंती देताना दिसत आहेत. काही क्रिकेट पंडित न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याकडेही विजेते म्हणून पहात आहेत. विश्वचषक स्पर्धेच्या तोंडावर सर्वच संघांतील खेळाडूंना दुखापतीपासून दूर राहण्याचे आव्हान आहे. नेहमी पाकिस्तानच्या क्रिकेट संघासाठी अनेक वेळा खेळाडूंची तंदुरुस्ती हा चिंतेचा विषय ठरला आहे. असे असताना पाकिस्तानी क्रिकेट मंडळ आणि व्यवस्थापन खेळाडूंच्या आहार पद्धतीबाबत एवढे कसे बेजबाबदार वागतात, असा प्रश्न अक्रमने उपस्थित केला.

Leave a Comment