प्रिया दत्त, पूनम महाजन यांच्या विरोधात तृतीयपंथी उमेदवार

trio
मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर-मध्य मुंबईतून काँग्रेसने प्रिया दत्त, तर भाजपने पुनम महाजन यांना रिंगणात उतरवलेले असतानाच तृतीयपंथी उमेदवार स्नेहा काळे यांनी सोमवारी त्यांच्याविरूद्ध लढा देण्यासाठी उमेदवारी दाखल केला आहे. त्या दुर्बल घटक आघाडी पक्षाच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. आजपर्यत कोणीच तृतीयपंथीसाठी काही केले नाही म्हणून निवडणुकीत उरतरण्याचा निर्णय मी घेतल्याचे काळे यांनी सांगितले.

काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि भाजपच्या पूनम महाजन यांच्यात या मतदारसंघात मुख्य लढत होणार आहे. पण दुसरीकडे स्नेहा काळे यांच्या तृतीयपंथीयांची फौज प्रचाराला उतरणार असल्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत. बी. कॉमपर्यंत काळे यांचे शिक्षण झाले आहे.

मोठ्या नोकरीची संधी तृतीयपंथी असल्यामुळे मिळत नाही. त्याचबरोबर समाजाकडून चांगली वागणूक नाही, रुग्णालयात उपचार मिळत नाहीत, पोलिसांकडून होणारा त्रास व काही लोकांकडून होणारा लैंगिक छळ याचा अनेक तृतीयपंथींना त्रास होतो. तृतीयपंथीयांनाही सन्मानाने जगण्याची संधी मिळण्यासाठी त्यांचा आवाज संसदेपर्यंत पोहचवण्यासाठी मी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, असे स्नेहा काळे यांनी सांगितले. आम्हाला आतापर्यत कोणत्याच सरकारने संधी दिली नाही, आमच्याकडे लक्ष दिले नाही. आम्ही असे किती दिवस वणवण फिरायचे, निवडणुकीसाठी निधीही जमा करणार आहे. समाजातील वंचित घटक, दुर्बल घटक, शेतकरी, सैनिक, शहीदांच्या विधवा, वेश्या आणि तृतीयपथीयांना न्याय देणे हा माझा प्रयत्न असेल, असेही काळे यांनी सांगितले.

Leave a Comment