तेलंगणामध्ये भाजप नेत्याकडून 8 कोटी रुपयांची रोकड जप्त

raid
हैदराबाद – गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून तेलंगणा पोलिसांनी 8 कोटी रुपये जप्त केले असून एका भाजप नेत्याच्या बँक खात्यातून ही सगळीच रक्कम काढण्यात आली होती. पोलिसांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या रोख रकमेच्या व्यवहारांवर करडी नजर आहे. सुरुवातीला पोलिसांनी एक कार अडवून त्यातून 2 कोटी रुपये जप्त केले. ड्रायव्हर आणि त्याच्या सहकाऱ्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली तेव्हा भाजप नेत्यांची नावे समोर आली. आता भाजप नेते पोलिसांवरच वरिष्ठ पातळीवर कटकारस्थान रचल्याचे आरोप करत आहेत.

यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 कोटी रुपये हिमायतनगर परिसरात ह्युंडेई वरना कारमधून जप्त करण्यात आले. या कारमध्ये प्रवास करणाऱ्या टी प्रदीप रेड्डी आणि जी शंकर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा पैसा नामपल्ली त्यांनीच भाजप मुख्यालयाचे अटेंडन्ट एन. गोपी यांच्याकडून मिळाल्याची कबुली दिली. इंडियन बँकेच्या नारायणगुडा शाखेत एन. गोपी यांचे आणखी 6 कोटी रुपये असल्याची माहिती सुद्धा त्या दोघांनी दिली. यानंतर पोलिसांनी बँक गाठले आणि तेथून गोपी आणि इतर 4 जणांना ताब्यात घेतले. सोबतच त्यांच्या बँक खात्यातून काढलेले आणखी 6 कोटी रुपये देखील जप्त केले.

भाजपच्या सर्वच आर्थिक व्यवहारांची एन. गोपी हाच काळजी घेत होता. भाजपचे तेलंगणा प्रदेशाध्यक्ष के. लक्ष्मण आणि शांता कुमार यांच्या त्याने काढलेल्या कॅशच्या चेकवर स्वाक्षऱ्या आहेत. कुठल्याही बँकेच्या होम ब्रांचमधून ग्राहकाने किती पैसे काढावेत त्यावर निर्बंध नाहीत. पण निवडणुकीच्या काळात एखाद्या उमेदवाराने किती पैसे खर्च करावे यावर नियंत्रण ठेवले जाते. परंतु, हा पैसा एखाद्या उमेदवाराचा नाही तर पक्षाचा असल्याने त्यास मर्यादा लागू होत नाहीत. त्यामुळे, या प्रकरणी कठोर कारवाई होईल अशी शक्यता कमीच आहे.

Leave a Comment