आता मराठी डेली सोपमधूनही होत आहे भाजपचा प्रचार

Bjp
मुंबई – सराईत गुन्हेगाराप्रमाणे वेळोवेळी भारतीय जनता पक्षातर्फे आचारसंहितेचा भंग केला जात आहे. पण यावेळी सत्ताधारी पक्षाच्या योजनांचा व नेत्यांच्या प्रचार व प्रसार करण्याकरिता अत्यंत गंभीर अशा पेड न्यूजच्या धर्तीवर टीव्हीवरील मालिकांचा उपयोग केला जात आहे. गेल्या आठवडाभरापासून हा प्रकार सुरू आहे.

भाजपने हिंदी मालिकांनंतर आता मराठी लोकप्रिय मालिकांकडे मोर्चा वळवला आहे. ‘मेक इन इंडिया’ योजनेचा प्रचार मराठी लोकप्रिय मालिका ‘तुला पाहते रे’ मालिकेतून ८ एप्रिलच्या प्राइम शोमधून करण्यात आला आहे. आता निवडणूक आयोगाकडे या विरोधात तक्रार करण्यात आली आहे.

भाजपतर्फे मालिकांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून छुप्या मार्गाने मायावी तंत्र वापरून प्रचार केला जात आहे. ही कार्यपद्धती समजून घेण्याकरिता झी टीव्हीवरील ‘तुझसे हे राबता’ व अॅन्ड टीव्हीवरील ‘भाभीजी घर पर है’ या मालिकांमधून यापूर्वी प्रचार झाला आहे. तर मेक इन इंडिया योजनेचा प्रचार मराठी लोकप्रिय मालिका ‘तुला पाहते रे ‘ मालिकेतून करण्यात आला असल्याचे आता उघड झाले आहे. मालिकांमधून होत असलेल्या जाहिरातीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सरकारतर्फे हाती घेण्यात आलेल्या अनेक योजनांची भलामण जाहिरातीप्रमाणे या मालिकांमध्ये करण्यात आली आहे. याकरिता कुठेही जाहिरात म्हणून सूचना देण्यात आलेली नाही. यातून लोकांची मानसिकता प्रभावित करून सत्ताधाऱयांना लाभ मिळवून देण्याचा कुटील डाव स्पष्टपणे समोर आला असल्यामुळे या प्रकाराची नोंद घेऊन जनतेचा विश्वासघात, आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल या वाहिन्यांचे प्रक्षेपण तत्काळ बंद करून वाहिन्यांचे मालक, निर्माते आणि कलाकारांसोबतच भाजपवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पुढे येत आहे. या प्रकरणात कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाला असण्याची शक्यता आहे. त्याचीही चौकशी करून भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल कराण्याची मागणी होत आहे.

Leave a Comment