मुकेश अंबानी आता रिअल इस्टेट क्षेत्रात, जागतिक स्तरावरचे शहर उभारणार

mukesha
टेलिकॉम क्षेत्रात भल्या भल्या टेलिकॉम कंपन्यांना जोरदार टक्कर देण्यात यशस्वी झाल्यावर रिलायंसचे प्रमुख मुकेश अंबानी आता रिअल इस्टेट क्षेत्रात पाय रोवण्यास सिद्ध झाले आहेत. रिलायंस इंडस्ट्री लिमिटेड ने मुंबईजवळ जागतिक दर्जाची मेगासिटी बनविण्याची ब्लु प्रिंट तयार केली असून मिडिया रिपोर्टनुसार रिलायंसचा हा एकमेव सर्वात मोठा प्रकल्प असेल कारण याचा प्रत्येक हिस्सा म्हणजेच एक प्रोजेक्ट असणार आहे.

मुंबईजवळ वसविल्या जाणाऱ्या या नव्या नगरीत सिंगापूरच्या धर्तीवर विमानतळ, पोर्ट, सी लिंक अशी कनेक्टीव्हिटी असेल. या शहरात ५ लाख लोक राहू शकतील तसेच हजारो कंपन्यासाठी जागाही असेल. १० वर्षात या प्रकल्पावर ७५ अब्ज डॉलर्स खर्च केले जातील आणि तरीही या अत्याधुनिक शहरातील जागांचे दर मुंबईच्या तुलनेत खूपच कमी असतील. यामुळे मुंबईवरचा माणसांच्या ताण कमी होऊन तेथील गर्दी कमी होण्यास मदत मिळेल असे सांगितले जात आहे. जाणकारांच्या मते रिलायंस जिओने २०१६ मध्ये सुरु झाल्यापासून टेलिकॉम सेक्टरवर जसा प्रभाव टाकला आहे त्याचप्रमाणे हा मेगा प्रोजेक्ट रिअल इस्टेट सेक्टरवर प्रभाव टाकेल. यामुळे भारतीय शहराची पायाभूत छबी बदलणार आहे.

हा मेगा सिटी प्रोजेक्ट खुद्द रिलायंस कडूनच विकसित केला जाणार असून त्याचे प्रशासनही रिलायंस कडे असेल असे समजते. त्यासाठी कंपनीने सोशल अॅथॉरिटी परवाना घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रिलायंसचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांनी सर्वप्रथम मुंबईच्या जवळ जागतिक दर्जाचे नवे शहर वसविण्याची कल्पना मांडली होती. १९८० च्या दशकात मुंबईतील गर्दी कमी व्हावी यासाठी असे नवे शहर वसविले जावे असे ते म्हणत असत. म्हणजे एक प्रकारे मुकेश वडिलांचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार आहेत.

गेल्याच महिन्यात मुकेश अंबानी यांनी जागतिक पातळीवर इकोनॉमिक हब विकसित करण्यासाठी नवी मुंबई सेझ कडून ४ हजार एकर जमीन लीज वर घेतली गेल्याची घोषणा केली होती. त्यासाठी प्राथमिक किंमत म्हणून २१०० कोटी रुपये दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Leave a Comment