आयपॅड ४८ वर्षासाठी लॉक,पत्रकार बापाच्या तोंडचे मुलाने पळविले पाणी

ipad
पत्रकार लोक भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळवितात असा सार्वत्रिक समज आहे. मात्र अमेरिकेतील इवान ओसनॅस या पत्रकाराचा केवळ तीन वर्षाचा मुलगा बापापेक्षा चलाख निघाला असून त्याने वडील कामासाठी बाहेर गेले असताना त्यांचे आयपॅड खेळायला घेतले आणि चुकीचे पासवर्ड देऊन ते चक्क ४८ वर्षे आणि ६ महिने या काळासाठी लॉक करण्याचा पराक्रम केला आहे. यामुळे इवान चांगलाच हैराण झाला आणि त्याने ट्विटरवर मदतीसाठी अपील केले. यात त्याने त्याच्या आयपॅडचा स्क्रीन फोटो शेअर केला आहे. त्यावर आयपॅड डिसेबल, ट्राय अगेन इन २५,५३६,४४२ मिनिट्स असे दिसते आहे. इवान म्हणतो, हे कदाचित खोटे वाटेल, पण ते खरे आहे. माझ्या मुलाने खेळताना त्यावर चुकीचे पासवर्ड दिल्याने हा घोळ झाला आहे.

इवानला मदत करू इच्छिणाऱ्या एका युजरने अॅपल मध्येच काम करणाऱ्या त्याच्या मित्राला यावर काय करता येईल असे विचारले तेव्हा त्याने काहीही करता येणार नाही. आम्ही काहीही करू शकत नाही. आता हे आयपॅड ४८ वर्षे काम करू शकणार नाही असे कळविले आहे. तर एकाने आणखी दोन चार वेळा चुकीचा पासवर्ड देऊन पहा कदाचित टायमर फेल होईल आणि आयपॅड पुन्हा काम करू लागेल असेही सुचविले आहे.

लहान मुलांचा स्क्रीन टाईम आणि त्याचे त्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम यावर जगात पुष्कळ संशोधन सुरु आहे मात्र मुलाच्या असल्या हस्तकौशल्याचा पालकांच्या तब्येतीवर काय परिणाम होतो याचे संशोधन कुठेही झालेले नाही. यंग जनरेशन टेक सॅव्ही होतेय याचा हा दणदणीत पुरावा असला तरी इवान समोरील समस्या कायम आहे. आता कुणीही नवीन फोन घ्या किंवा नवीन आयपॅड आणा असा सल्ला देऊ नये असे इवानला वाटते कारण फोन नवीन येईलही पण या आयपॅड मध्ये त्याचा जो महत्वाचा डेटा आहे तो कसा परत मिळवायचा हा खरा प्रश्न आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी चीन मध्ये जेव्हा आयफोनवर बंदी नव्हती तेव्हा तेथील एका दीड वर्षाच्या मुलाने असाच आईचा फोन खेळायला घेऊन तो ३६ वर्षासाठी लॉक केल्याची बातमी आली होती.

Leave a Comment