आम्ही केलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध करावे अन्यथा राजकारण सोडावे – संदीप देशपांडे

sandeep-deshpande
मुंबई – शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी सरकारच्या डिजिटल इंडिया योजनेची पोलखोल केल्यानंतर ठाकरे यांच्या पक्षावर विनोद तावडेंनी गंभीर टीका केली. तावडेंच्या टीकेला उत्तर देताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तावडेंमध्ये दम असेल, तर त्यांनी आम्ही केलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध करावे अन्यथा राजकारण सोडावे, असे म्हटले आहे.

शनिवारी गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेले भाषण हे भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागले आहे. त्यातूनच ठाकरे यांच्या पक्षावर तावडेंनी गंभीर टीका केली. शनिवारच्या भाषणात ठाकरे यांनी मोदींच्या डिजिटल इंडियाची पोलखोल केल्यामुळे संतप्त झालेले तावडे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, पक्षासाठी एवढा अभ्यास केला असता तर फायदा झाला असता. आधी कष्ट घेतले असते तर दुसऱ्याला मदत करायची वेळ आली नसती.

देशपांडे तावडेंच्या या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देताना म्हणाले, तावडे यांनाच माझे नाही, तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आव्हान आहे. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावी, नाही तर फालतू बडबड बंद करावी. हरिसाल येथील जी पोलखोल आम्ही केली त्याबाबत तावडे जे म्हणाले आहेत. माझे त्यांना खुले आव्हान आहे. आमच्यासोबत त्यांनी यावे आणि खरे खोटे करावे. आम्ही सादर केलेली एक गोष्टदेखील खोटी निघाली तर आम्ही राजकारण सोडू नाहीतर त्यांनी राजकारण सोडावे. राज यांच्या वाक्यांची मोडतोड करून चुकीचा अर्थ काढला जात आहेत. ती भाजपची जुनी सवय आहे. खोट बोला पण रेटून बोला, असेही ते यावेळी म्हणाले.

Leave a Comment