मोदी यांचा गुजरात विकासाचा दावा किती खोटा हे गुजरातमध्ये आल्यावर कळेल

hardik-patel
मुंबई – गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी मुंबईच्या उत्तर पश्चिम विभागातील युवकांसाठी काँग्रेसतर्फे आयोजित युवा संमेलनात बोलताना एकीकडे तरुणांना राजकारणात या असे आवाहन नरेंद्र मोदी करतात, त्यातच दुसऱ्याबाजुला न्यायालयाच्या माध्यमातून आडकाठी घालत मला निवडणूक लढवू देत नसल्याची टीका केली आहे. उत्तर मुंबईच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर, संजय निरुपमही यावेळी उपस्थित होते.

देशातील जनतेला भाजप सरकारने फसवले आहे. लोकांच्या प्रश्नावर ते कधीच बोलत नाहीत. लोकांमध्ये राष्ट्रवादावर संभ्रम निर्माण करतात. त्यांच्या विरोधात देशातील जे कोणी तरुण, शेतकरी बोलतात ते त्यांना देशद्रोही ठरवतात. अशा या खोटारड्या सरकारला सत्तेतून खाली उतरवायचे असेल तर देशातील तरुणांनी जागे होण्याची गरज आहे. मोदी एकीकडे दलितांचे पाय धुतात तर दुसरीकडे दलित मुलीवर त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने बलात्कार केला, अजून त्यावर कारवाई झाली नाही.

पटेल, गांधी, आझाद यांचा काँग्रेस पक्ष आहे. देश काँग्रेस पक्षाने घडवला आहे. इंग्रजांची गुलामी ज्या लोकांनी केली आम्हाला राष्ट्रवाद त्या लोकांनी शिकवू नये. आमच्यासारख्या युवासाठी काँग्रेस पक्ष गर्वाचा पक्ष आहे. गांधी पटेलांचे खरे वास्तव सांगण्यासाठी मी आलो आहे. आम्हा तरुणांना रोजगार, शिक्षण आणि सुरक्षा हवी आहे. भाजपकडे आता काही मुद्दे नसल्याने ते काहीही बोलत सुटले आहेत.

गुजरातचा विकास केला असल्याचा दावा मोदी करतात. त्यांचा हा दावा किती खोटा आहे हे तुम्हाला गुजरातमध्ये आल्यावर कळेल. भीतीच्या वातावरणात गुजरातमधील लोक राहत आहेत. आमच्या राज्याची आज परिस्थिती भयानक आहे. कुणीही सुरक्षित नाही. गुजरातच्या सौराष्टात आज दुष्काळ आहे तरी राज्य व केंद्र सरकारकडून कोणत्याही उपाय योजना केल्या जात नाही आहे. गुजरातची आजची परिस्थिती तुम्ही पाहिली असती तर मोदी कधीच पंतप्रधान झाले नसते. आम्ही तरूणांनी ज्याला दिल्लीत पोचवले, त्या मोदींना आता पायउतार करण्याची वेळ आली आहे. याची जबाबदारी आज तरुणांवर आहे.

Leave a Comment