आक्रमक झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेची लोकसभा निवडणुकीतून माघार

suresh-patil
मुंबई – लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेने केली होती. पण महाराष्ट्र क्रांती सेनेने अवघ्या काही महिन्यातच आपली तलवार म्यान करून, निवडणुकीतून माघार घेत भाजप-शिवसेनेला थेट पाठींबा दिला आहे. महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश पाटील हे अध्यक्ष आहेत.

एकूण 15 उमेदवार महाराष्ट्र क्रांती सेनेने लोकसभा निवडणुकीसाठी उभे केले होते. त्यातील 9 उमेदवारांनी उमेदवारी अर्जदेखील भरले होते. पण उमेदवारांवर आता निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे अर्ज मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे. हे 9 उमेदवार उद्या आपले अर्ज मागे घेणार आहेत. महाराष्ट्र क्रांती सेनेने निवडणूक न लढण्याचा निर्णय मुंबईत शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत घेतला.

भाजप विरोधात निवडणूक लढण्याच्या इराद्यात स्थापन झालेली महाराष्ट्र क्रांती सेना आता महायुतीच्या मांडीला मांडी लावून बसणार असून, महायुतीमध्ये घटकपक्ष म्हणून सहभागी होण्याचे पत्र या पक्षाने चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेला दिले आहे. महाराष्ट्र क्रांती सेनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी यावेळी बोलताना एकूण 15 उमेदवार लोकसभेची निवडणूक आमच्या पक्षाकडून लढवणार होते त्यापैकी 9 लोकांनी प्रत्यक्षात उमेदवारी अर्जदेखील दाखल केले होते, परंतु आता हे उमेदवार आपले अर्ज मागे घेतील आणि शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारास मदत करतील असे सांगत, आमच्या समाजाच्या ज्या काही मागण्या असतील त्याला न्याय देण्याचे शिवसेना- भाजपाने आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment