उरी हल्ला आणि त्यानंतर भारतीय कमांडोनी पाक भूमीवर केलेला सर्जिकल स्ट्राईक देशात आजही अभिमान आणि चर्चेचा विषय बनून राहिले असताना फॅशन वर्ल्डही त्यापासून अलिप्त राहू शकलेले नाही असे दिसून येत आहे. सध्या या जगतात आर्मी प्रिंट्स ट्रेंड मध्ये असून केवळ कपडेच नाही तर अॅक्सेसरीजही मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत. डिझायनर रीना श्रीवास्तव हिच्या मते सर्व कार्यक्रम, अवॉर्ड फंक्शन मध्ये हीच प्रिंट्स आवर्जून वापरली जाताना दिसत आहेत. त्यामागे सैनिकांप्रती सन्मान तसेच पुलवामा शाहिदांचे स्मरण ही भावना मुख्यत्वे आहे.
फॅशन जगतावर आर्मी प्रिंटची मोहिनी
अर्थात आर्मी प्रिंटमुळे फ्रेश लुक मिळतो आहे तसेच सगळ्यांपेक्षा काहीतरी हटके असल्याचे समाधानही. अर्थात ही प्रिंट हिट करण्यात सोशल मिडीयाचा हातभार मोठा आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर अनेकांनी आर्मी प्रिंट ड्रेस मधील फोटो शेअर केले आहेत. आणि त्यामुळे डिझायनरनी नवनवीन प्रयोग करण्यास प्राधान्य दिले आहे. यात स्टायलिश जॅकेट्स, टीशर्टस, पँटस, स्कर्ट, कुर्ते, लेगीन्स, जेगीन्स, आणि अॅक्सेसरिज यांचा समावेश आहे. आर्मी प्रिंट मध्ये क्रिएटीव्हिटीला खूप वाव आहे आणि हे ड्रेसेस नोटीसेबल आहेत.
अर्थात ही प्रिंट वापरण्यास काही मर्यादा आहेत. बॉडीशेप लक्षात घेणे सर्वात महत्वाचे. छोटी बॉडी असलेल्या मुलीनी छोटी प्रिंट निवडायला हवीत. वजन जास्त असेल तर लाईट पॅटर्न निवडावेत. उंची अधिक असेल तर वरपासून खालपर्यंत प्रिंट कॅरी करणे सोपे जाते. आलीया भट्टने एका कार्यक्रमांत असा ड्रेस वापरला आहे तसेच जॅकलीन, करीना, कतरिना यांनी तसेच वरुण धवन, शाहरुख, सलमान या प्रिंट मध्ये दिसले आहेत.
सर्जिकल स्ट्राईकचे डिजिटल प्रिंट असलेल्या साड्या बाजारात आल्या असून त्यांना चांगली मागणी असल्याचे साडी व्यापारी सांगत आहेत.