उठाबश्यांची शिक्षा? नव्हे हा तर सुपर ब्रेन योगा

utha
शाळेत जाण्याच्या वयातील प्रत्येक विद्यार्थ्यांना उठा बश्या काढण्याची शिक्षा अनेकदा भोगावी लागली असेल. आता नव्या शालेय शिक्षा नियमात कदाचित ही शिक्षा दिली जात नसेल पण अगदी १५ -२० वर्षापूर्वीपर्यंत भारतातील बहुतेक सर्व शाळात उठाबश्या काढायला लावणे ही शिक्षा न ऐकणाऱ्या, दंगा मस्ती करणाऱ्या तसेच अभ्यास करून न येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जायची. कित्येक ठिकाणी ती आजही अमलात आणली जात असेल. वर्गासमोर एखाद्या विद्यार्थ्याला उठा बश्या काढणे अपमानास्पद वाटत असे आणि ही शिक्षा होऊ नये म्हणून तो शिस्त पाळण्यास प्रवृत्त होत असे. भारतात शेकडो वर्षापूर्वी शिक्षण ज्या गुरुकुल पद्धतीने दिले जात असे तेथेही ही शिक्षा दिली जाई याचे अनेक पुरावे आहेत.

brain
उठा बश्या काढणे यावर जगभरात अनेक देशात संशोधन केले गेले आहे आणि त्याचे अहवाल अतिशय उत्साहवर्धक आहेत असे सांगितले तर कुणाचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण विविध संशोधनांतून असे दिसून आले आहे कि दिवसाकाठी किमान एक मिनिट उठाबश्या काढणे आरोग्यासाठी खूपच फायद्याचे आहे. यात डाव्या हाताने उजवा कान आणि उजव्या हाताने डावा कान पकडून उठाबश्या काढल्या जातात. परेदेशी संशोधकांनी या क्रियेला सुपर ब्रेन योगा असे नाव दिले असून भारतात प्राचीन काळापासून गुरुकुलात हा योगा विद्यार्थ्यांना करावा लागत असे.

super
कानाच्या पाळीवर अनेक अॅक्युप्रेशर पॉइंटस असतात. हाताने कानाची पाळी पकडली आणि उठा बश्या काढल्या कि हे पॉइंट दाबले जातात. यामुळे मेंदूच्या काही पेशी सक्रीय होतात. आणि मेंदू अधिक तेज तसेच तल्लख होतो. माणसाची कार्यक्षमता वाढते. स्मरण पेशींना रक्त पुरवठा वाढतो आणि विस्मरण कमी होते. मेंदूचा डावा भाग आणि उजवा भाग यातील सामंजस्य वाढते आणि ते एकमेकांना अनुरूप कार्य करतात. यामुळे मन शांत होते, एकाग्रता वाढते. परदेशात याला सुपर ब्रेन योगा असे नाव दिले गेले असून त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढते आहे. अमेरिकेत यावर विशेष कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत.

मराठीत उठा बश्या असे या शिक्षेला नाव आहे तर कानडीत त्याला बस्की म्हणतात आणि तमिळ मध्ये थोप्पूकरणं असे म्हटले जाते. दाक्षिणात्य मंदिरात देवासमोर प्रार्थना करताना कान पकडून अश्या उठबश्या काढल्या जातात आणि ही प्रथा फार प्राचीन आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment