फुटबॉल खेळात जगातील वयाने सर्वात मोठा गोलकीपर किती वर्षाचा असेल असे कुणाला विचारले तर त्याचे उत्तर ६० किंवा ६५ वर्षे असे असू शकेल कारण या बाबत गिनीज रेकोर्ड सांगते त्यानुसार सर्वात वयोवृद्ध गोलकीपर रेकॉर्ड २०१८ पर्यंत तरी ५३ वर्षीय उरुग्वेचा रोबर्ट याच्या नावावर आहे. मात्र आता हे रेकॉर्ड मोडले आहे इसाकी हायिक या इस्त्रायलच्या गोलकीपरने.
इसाकी ठरला जगातील सर्वात वयोवृद्ध गोलकीपर
इसाकीने चक्क वयाच्या ७३ व्या वर्षी शुक्रवारी इस्रायली लीग मध्ये टीम इरोनी साठी गोलकीपिंग केले तेही पूर्ण ९० मिनिटे. अर्थात विरोधी टीम मेकाबी रमत जाईनकडून इसाकच्या टीम ला पराभव पत्करावा लागला तरी इसाकीने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून अनेक उत्तम शॉट अडविले आणि गोल होण्यापासून संघाला वाचविले. इतकेच नव्हे तर सामना संपल्यावर इसाकने तो पुढचा सामना खेळण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.
इसाकीचा ३६ वर्षाचा मुलगा म्हणाला वडिलांचे हे कर्तृत्व अविश्वसनीय आहे. तर इसाकी म्हणतो, मला ७४ वर्षे पूर्ण होण्यास तीन दिवस बाकी आहेत. इस्त्रायल साठी मी अजूनही खेळू शकतो यापेक्षा अधिक मोठे भाग्य कोणते? हा सामना माझ्यासाठी आनंदाची पर्वणी आहे. गिनीज बुकने इसाकच्या या पराक्रमची नोंद घेतली आहे आणि त्याला तसे सर्टिफिकेट दिले आहे.