विराट कोहली बनला आयपीएलचा 5 हजारी फलंदाज

virat-kohli
मुंबई : आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहली हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाज ठरला आहे. पाच हजार 110 (5110) धावा विराटच्या नावे जमा आहेत.

शुक्रवारी बंगळुरुत कोलकाता नाईट रायडर्सविरोधात झालेल्या सामन्यात कोहलीने हा विक्रम आपल्या नावे केला. आतापर्यंत सुरेश रैनाच्या नावे आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान होता. आयपीएलमध्ये रैनाने पाच हजार 86 (5086) धावा केल्या आहेत. कालच्या सामन्यात कोहलीने 49 चेंडूंमध्ये 84 धावा केल्या. कोहलीचे हे या मोसमातील पहिलेच अर्धशतक ठरले. त्याने 31 चेंडूंमध्ये अर्धशतकापर्यंत मजल मारली होती. आयपीएलच्या संपूर्ण इतिहासात हे कोहलीचे 35 वे अर्धशतक आहे.

वैयक्तिक विक्रमासाठी कोहलीची झुंजार खेळी फायदेशीर ठरली, तरी बंगळुरु संघाला हा सामना जिंकता आला नाही. बंगळुरुने दिलेले 206 धावांचे आव्हान कोलकाता नाईट राईडर्सने सहज पार करत तिसरा विजय साजरा केला. तर बंगळुरुची पराभवाची मालिका कायम राहिली.

दरम्यान, टी20 फॉर्मेटमध्ये आठ हजार धावा करणारा कोहली हा दुसरा भारतीय ठरला आहे. याआधी केवळ सुरेश रैनाच्या नावे हा विक्रम होता. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल हा टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 374 सामन्यात बारा हजार 374 धावा ठोकल्या आहेत. ब्रँडन मॅक्युलम हा यादीत 9 हजार 922 धावांसह दुसरा आहे.

Leave a Comment