अखेर शॉटगन यांचा काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश

shatrughn-sinha
नवी दिल्ली – आज काँग्रेसमध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी अधिकृत प्रवेश केला आहे. त्यांनी दिल्ली येथे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांच्या उपस्थितीत पक्षाचे सदस्यत्व ग्रहण केले. त्यांनी भाजपमध्येच असून पक्षाच्या कामावर सतत हल्ला चढवले होते. त्यानंतर त्यांनी शेवटी काँग्रेसचा हात पकडला.

शत्रुघ्न सिन्हा यांना भाजपने यावेळी पटणासाहिब येथून लोकसभेचे तिकीट दिले नाही. रविशंकर प्रसाद यांना त्याजागी उमेदवारी दिली आहे. पटणासाहिब येथून त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात येईल, अशी चर्चा आहे.

शत्रुघ्न सिन्हा गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेतृत्वावर सातत्याने टीका करत होते. यावरुन हे स्पष्ट झाले होते की, आगामी लोकसभा निवडणुकीत सिन्हा यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार नाही. राहुल गांधी यांनी नुकताच प्रत्येक कुटुंबाला वर्षाला ७२ हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. या योजनेची स्तुती करत हा ‘मास्टरस्ट्रोक’ असल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे.

भाजपच्या स्टार प्रचारकांमधील शत्रुघ्न सिन्हा एक राहिलेले आहेत. पण आपल्याला आपल्या पक्षात महत्त्व दिले जात नसल्याचे सिन्हा यांनी बोलून दाखविले होते. तसेच पंतप्रधान मोदी आणि भाजपध्यक्ष अमित शहांवर सिन्हा यांनी अनेकदा टीका केली होती. यावरुन सिन्हा दुसऱ्या पक्षात सामील होतील, असे वाटत होते.

Leave a Comment