न्यूझीलंड पंतप्रधान जेसिंडाची एका आईला अशी मदत

jesinda
न्यूझीलंड मधील ख्राइस्टचर्च येथे एका माथेफिरूने मशिदींवर केलेल्या गोळीबार घटनेनंतर बुरखा आणि हिजाब घालून पीडितांच्या भेटीसाठी जाऊन पंतप्रधान जेसिंदा अर्नाड या खूपच चर्चेत आल्या होत्या. याच ख्राइस्टचर्च मध्ये कोणताही बोलबाला न करता दोन मुलांच्या एका आईला गुपचूप मदत करण्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

येथील सुपरमार्केटमध्ये एक महिला तिच्या दोन मुलांना घेऊन किराणा माल खरेदीसाठी आली होती. तिने किराणा खरेदी केला आणि बिल देताना पैशाची पर्स घरीच विसरली असल्याचे तिच्या लक्षात आले. तिच्या मागेच लायनीत जेसिंडा होत्या. काय प्रकार घडला हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित पुढे होऊन त्या महिलेचे बिल चुकते केले. गुरुवारी या संदर्भातील माहिती जिला मदत केली त्या महिलेच्या मैत्रिणीने ट्विटरवर शेअर केली. संबंधित महिलेने त्याला दुजोरा दिला असून न्यूझीलंड हेराल्डने या महिलेचे नाव प्रसिद्ध न करता तिने सांगितलेली घटना वर्णन केली आहे. हि महिला म्हणाली प्रथम माझ्या मागे लायनीत जेसिंडा आहे याचे मला खूप आश्चर्य वाटले होते. मी बिल देण्यासाठी पर्स शोधत असताना ती एकदम पुढे आली आणि तू दोन मुले घेऊन आली आहेस आणि तुझी पर्स घरी विसरली आहे हे माझ्या लक्षात आले आहे असे सांगून तिचे बिल दिले.

जेसिंडा यानाही एका पत्रकाराने अशी घटना खरोखर घडली काय असे विचारले तेव्हा त्यांनी त्याला होकार दिला आणि केवळ ती दोन मुलांची आई आहे हे लक्षात आल्यानेच मी तिला मदत केली असे स्पष्ट केले.

Leave a Comment