धावत्या रेल्वे गाडीवर दगड फेकून खिडक्यांच्या काचा फोडण्याचे प्रकार झाले तरी खिडक्यांच्या काचा फुटू नयेत असे नवे तंत्रज्ञान रेल्वेने उपयोगात आणले असून ते यशस्वी ठरले तर सर्व रेल्वे गाड्यांना अश्या काचेच्या खिडक्या बसविल्या जाणार आहेत. आपल्या देशात धावत्या ट्रेनवर दगडफेक करून खिडक्या फोडण्याचे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे रेल्वेचे नुकसान होतेच पण दगड लागून गाडीतील प्रवासी गंभीर जखमी होण्याचा धोका असतो. यावर नियंत्रण आणण्यासाठी रेल्वे प्रशासन अनेक उपाययोजना करते मात्र त्या तितक्या प्रभावी ठरत नाहीत असे दिसून येत आहे.
आता रेल्वेकोच साठी न फुटणाऱ्या काचांच्या खिडक्या
यासाठी विनायाल कोटेड शीट व रेसीन कोटिंग केलेल्या काचा चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी मध्ये कोचच्या खिडक्यांना बसविल्या जात आहेत. देशातील सर्वात वेगवान वंदे भारत रेल्वे कोचना या काचा असलेल्या खिडक्या बसविल्या जात आहेत. या कोटिंग मुळे काच अधिक मजबूत होतेच पण दगड मारला तरी काच तुटत नाही. मारलेला दगड आलेल्या दिशेने पुन्हा परतवला जातो. शिवाय आतील प्रवासी बाहेरचे दृश्य पाहू शकतात पण बाहेरून आतील काही दिसत नाही असे उत्तर मध्य रेल्वेचे पीआरओ डॉ. अमित मालवीय यांनी सांगितले. ते म्हणाले रेल्वे आणि प्रवासी सुरक्षा यासाठी नेहमीच नवे मार्ग चोखाळले जातात त्यातील हा एक आहे.
वंदे भारत रेल्वे सुरु झाली तेव्हा पहिल्याच दिवशी तिच्या खिडक्यांवर फिरोजाबाद येथे दगडफेक केली गेली त्यानंतर १ मार्च रोजी भरवारी येथे, ३ व १२ मार्च रोजी फतेपूर येथे तर १७ मार्च रोजी कानपूरजवळ दगडफेक केली गेली त्यात खिडक्यांच्या काचा तुटल्या होत्या. नवीन तंत्रानुसार काचेचे कोटिंग करताना त्यात राळ वापरली गेली आहे त्यामुळे काच अधिक कणखर बनली असून ती सहजी तुटणार नाही. लवकरच सर्व वेगवान गाड्यांना या काचा बसविल्या जाणार आहेत.