‘द युनिव्हर्सिटी ऑफ लॉ’कडून शाहरुख खानला लोककल्याण विषयातील पदवी प्रदान

shahrukh-khan
आजवर अनेक पुरस्कारांनी अभिनेता शाहरुख खानला गौरविण्यात आले आहे. आता शाहरूखला लंडनमधील विद्यापीठाने मानद पदवी देऊन गौरवले आहे. त्याला लोककल्याण विषयातील पदवी ‘द युनिव्हर्सिटी ऑफ लॉ’कडून प्रदान करण्यात आली. हा दीक्षांतसोहळा साडेतीनशे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडला.

मानवी हक्क, न्याय आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत शाहरूखने सक्रिय सहभाग नोंदवला. या कार्यात त्याने मोलाचे योगदान दिले असल्यामुळेच अभिनेता, निर्माता शाहरूखला आम्ही लोककल्याण विषयातील पदवी प्रदान करत असल्याचे विद्यापीठाने ट्विट करत म्हटले असून ही पदवी शाहरूखने स्वीकारली आहे.


‘मीर फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेद्वारे शाहरूख खान महिला सबलीकरण , पुनर्वसन आणि मानवी हक्कांसाठी काम करतो. पदवी स्वीकारत शाहरूखने समस्त विद्यार्थी, विद्यापीठाचे आभारही मानले. गाजावाजा न करता कोणतीही मदत आणि दान हे शांततेत करावे, दात्याचा शुद्ध हेतू यातच दिसून येतो. प्रसिद्धी करून केलेल्या दानाला काहीही अर्थ नसल्याचे मी मानतो. महिला सबलीकरण आणि वंचितांच्या हक्कांसाठी मी सदैव प्रयत्नशील राहिल, असे शाहरूख म्हणाला.

Leave a Comment