असा आहे रणवीरचा 83मधील संपूर्ण संघ

ranveer-singh
क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने 25 जून 1983 साली क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट येणार आहे. अभिनेता रणवीर सिंग चित्रपटामध्ये तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार असून काही ठराविक वेळाने चित्रपटातील अन्य पात्रांच्या भूमिकांवरील पडदाही दूर करण्यात आला आहे. दोन मराठमोळ्या कलाकारांचीही वर्णी या चित्रपटामध्ये लागली आहे. सध्या चित्रिकरणासाठी ’83’ चित्रपटातील कलाकारांची संपूर्ण टीम सज्ज झाली असून या टीमचा एक फोटो रणवीरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

दिग्दर्शक कबीर खान ‘83 ’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट सांभाळत आहे. रणवीर सिंग, एमी विर्क,चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.


तत्कालीन कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे. 83च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रीनिजला ज्यांनी क्लीन बोल्ड केलेल्या त्या बलविंदर सिंग यांची भूमिका एमी विर्क साकारणार आहे. क्रिकेटर संदीप पाटील यांची भूमिका त्यांचा मुलगा चिराग पाटील करणार आहे. त्याचप्रमाणे त्याकाळी इंडिया टीमचे उपकर्णधार मोहिंदर अमरनाथ यांच्या भूमिकेत साकीब सलीम दिसणार आहे.

ताहिर भसीन सुनील गावस्कर यांची भूमिका व यशपाल शर्मा यांची भूमिका जतिन सरना साकारणार आहे. तर माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे हा दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात पीआर मान सिंग यांची भूमिका पंकज त्रिपाठी करणार आहे. 1983 साली मान सिंग विश्व चषक संघाचे मॅनेजर होते.

Leave a Comment