कोल्हापूरात राज ठाकरेंची राजू शेट्टींसाठी प्रचार सभा

combo
कोल्हापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात न उतरताही सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यास सज्ज झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या 9 ते 10 उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार असल्याची माहिती इतर माध्यमांमध्ये देखील आली आहे. राज ठाकरे कोल्हापूरच्या मैदानात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राजू शेट्टी यांच्यासाठीही उतरणार आहेत.

राज ठाकरे येत्या 18 किंवा 19 एप्रिल रोजी राजू शेट्टींच्या हातकणंगले जागेसाठी कोल्हापुरात सभा घेणार आहेत. राज ठाकरे आणि राजू शेट्टी या सभेच्या निमित्ताने पहिल्यांदाच जाहीर व्यासपीठावर एकत्र दिसतील. महाआघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटना ही घटकपक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निवडक उमेदवारांसाठी सभा घेत असताना, राज ठाकरे हे खासदार राजू शेट्टी यांच्यासाठीही कोल्हापूरच्या मैदानात उतरणार आहेत.

राज्यभर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहेत. तसेच, राज ठाकरे यांचा वैयक्तिक करिष्मा सुद्धा मोठा आहे. राज ठाकरेंची भाषण ऐकण्यासाठी आणि त्या भाषणांमधून प्रभावित होणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. राजू शेट्टींना याचा फायदा हातकणंगलेत होण्याची शक्यता आहे. खरेतर हातकणंगले हा राजू शेट्टी यांचा बालेकिल्ला आहे. तेथून शेट्टी विजयी होतील, असा अनेक सर्वेक्षणांनीही अंदाज वर्तवला आहे. पण, राज ठाकरेंच्या सभेने राजू शेट्टींचा विजय आणखी मोठा होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचारासाठी 9 सभा घेणार असल्याची माहिती इतर माध्यमांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह 9 उमेदवारांसाठी प्रचाराच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

Leave a Comment