गेल्या पाच वर्षात ६८ टक्क्यांनी वाढली राहुल गांधींची संपत्ती

rahul-gandhi1
नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले असून एकूण १५.८८ कोटी रुपयांची संपत्ती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे असून त्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात ६८.९३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही माहिती राहुल गांधींनी स्वतः आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, ५.८ कोटी रुपयांची गुंतवणूक राहुल गांधींकडे आहे. तर, ९.२ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांनी २०१४ मधील निवडणुकीत आपल्या ९.४० कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीची घोषणा केली होती. तसेही २००४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करताना करण्यात आलेल्या घोषणेनुसार, राहुल गांधींची संपत्ती गेल्या १५ वर्षांत २,७४५ टक्के वाढली आहे.

राहुल गांधींची २००४ मध्ये ५५ लाख ८३ हजार १२३ रुपये एवढी संपत्ती होती. त्यानंतर २००९ मध्ये त्यांची एकूण संपत्ती २ कोटी रुपये होती. २०१४ मध्ये त्यांची संपत्ती ९.४० कोटी रुपये होती. त्यानंतर सध्या त्यांची संपत्ती १५.८८ कोटी रुपये आहे. ४० हजार रुपयांची रोख रक्कम राहुल गांधी यांच्याजवळ आहे. त्यांचे विविध बँकांमध्ये १७.९३ लाख रुपये आहेत.

त्याचबरोबर त्यांनी विविध कंपन्यांमध्ये ५.१९ कोटी रुपये बॉन्ड, डिबेंचर आणि शेअर्समध्ये गुंतवले आहेत. त्यांच्याजवळ ३३३.३ ग्रॅम सोनेही आहे. दिल्लीच्या सुल्तानपूर गावात त्याची पारंपारिक शेतजमीन आहे. त्याचबरोबर गुरुग्राममध्ये त्यांची दोन कार्यालये आहेत.