राहुल गांधी विरोधात निवडणूक लढवणार ‘इलेक्शन किंग’ के. पद्मराजन

k-padmrajan
सेलम : सर्वात अयशस्वी व सर्वात जास्त निवडणुका लढविणारा उमेदवार म्हणून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव दाखल करणारे के. पद्मराजन यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या आयुष्यातील ही २०१वी निवडणूक आहे. आतापर्यंत एकही निवडणूक न जिंकूनही ते ‘इलेक्शन किंग’ म्हणून ओळखले जातात. आता ते गिनिज बुकात आपली नोंद होण्याकरिता ते आता नवा विक्रम रचू पाहात आहेत.
k-padmrajan1
त्यांना आपल्या कृतीतून सामान्य माणूसही निवडणूक लढू शकतो हेच सिद्ध करायचे असते. त्यांचा वाहनांच्या टायरची विक्री करण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी तामिळनाडूतील धर्मापुरी मतदारसंघातूनही उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर ते आता वायनाडमध्ये दाखल झाले. सातत्याने निवडणुका लढविण्याच्या प्रयत्नांमुळे माझे नाव २००४ साली गिनिज बुकात नोंदविण्यात आले आहे. माझे नाव २०१५ साली गिनिज बुकच्या वेबसाइटवरही झळकले आहे. पण अजून मी विक्रम केलेला नाही. ते ध्येय साध्य करायचे आहे, असे ६० वर्षे वयाचे के. पद्मराजन सांगतात, तेव्हा हे ऐकणारे सारेच जण अचंबित होतात.
k-padmrajan2
त्यांनी पहिली निवडणूक १९८८ साली मेत्तूर विधानसभा मतदारसंघातून लढविली होती. नंतर १९९६ साली लोकसभा व विधानसभा निवडणुकांत वेगवेगळ्या आठ मतदारसंघांतून त्यांनी अर्ज दाखल केले होते. पण निवडणूक आयोगाने त्यानंतर एखाद्या उमेदवाराने एकाचवेळी दोन मतदारसंघांतूनच निवडणूक लढवावी असा नियम केला होता. पद्मराजन यांना आतापर्यंत सवाधिक ६७२३ मते २०११ साली मेत्तूर विधानसभा मतदारसंघात मिळाली होती. त्यांनी गेल्या ३० वर्षांत निवडणुकांवर ३० लाख रुपये खर्च केले आहेत. ते आंध्र प्रदेशमधील नांद्यालमधून दिवंगत पी. व्ही. नरसिंह राव यांच्याविरोधात उभे होते. करुणानिधी, जयललिता, एस. एम. कृष्णा, बंगारप्पा, एच. डी. कुमारस्वामी आदींच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे धाडस पद्मराजन यांनी दाखविले आहे.

Leave a Comment