पाचशे वर्षे जुने राजा विक्रमादित्य मंदिर

vikramadity
मध्यप्रदेशातील उज्जैन नगरी मध्ये राजा विक्रमादित्य याचे राज्य होते. विक्रम आणि वेताळ या गोष्टी आपण लहानपणी खूप ऐकल्या असतील तोच हा राजा विक्रमादित्य. तसेच शनीची साडेसाती हा खडतर प्रकार अनेकांनी अनुभवला असेल. या विक्रमादित्य राजाला त्याच्या साडेसाती मध्ये शनी देवाने कसे छळले होते याचे वर्णन ज्यांनी शनीमहात्म्य स्त्रोत्र वाचले असेल त्यांना माहिती असेल. उज्जैन ही महांकालेश्वर महादेवाची नगरी. येथेच शक्तीपीठ हरसिद्धी मंदिर आहे. या मंदिराजवळ राजा विक्रमादित्याचे मंदिर आहे. हे मंदिर ५०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.

या मंदिराबद्दल तसेच पराक्रमी राजा विक्रमादित्य बद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. देशभरातून भाविक या राजाच्या दर्शनाला येतात. दर चैत्री पाडव्याला म्हणजे गुढी पाडव्याला या विक्रमादित्य राजाला ५६ भोग नैवेद्य दाखविला जातो. कारण याच राजाने देवी देवताना ५६ भोग नैवेद्य दाखविण्याची प्रथा सुरु केली होती. विक्रमादित्याच्या दर्शनाने ग्रह पिडा नाहीशी होते असा विश्वास आहे. या मंदिराचे पुजारी अखिलेश जोशी यांच्या घराण्याकडे कित्येक वर्षे या मंदिराच्या पूजेचा वारसा आहे.

पुजारी जोशी सांगतात त्यांच्या घरात एका प्राचीन भोजपत्रावर एक यंत्र कोरले गेले असून तो जगाचा नकाशा आहे. त्यांच्या मध्यावर एक भ्रुण दाखविले गेले असून ते पृथ्वीचे नाभिकेंद्र आहे. हे नाभी केंद्र विक्रमादित्य राजाच्या मूर्तीच्या पायाखाली येते असे मानले जाते. कालांतराने राजा जयसिंग याने क्षिप्रा नदीच्या घाटाजवळ यंत्र महाल बांधला. तेथून पुढील १०० वर्षाचे पंचांग मोजले जाऊ लागले.

विक्रमादित्य मंदिरात येऊन दर्शन घेतल्यावर साडेसाती, ग्रहपीडा शांत होते असा भाविकांत विश्वास आहे पण त्याचबरोबर असेही सांगतात की जे लोक येथे दर्शनासाठी येतात त्यांना राजा विक्रमादित्य त्यासाठी प्रेरणा देतो. म्हणजे कित्येकांना या मंदिराची माहिती नाही तेही योगायोगाने येथे दर्शनाला येतात म्हणजे त्यांना राजाच्या दर्शनाचा योग असतो. दर गुढी पाडव्याला येथे मोठा उत्सव साजरा होतो.

Leave a Comment