जगातील बड्या मोबाईल बाजारातील एक असलेल्या भारतीय मोबाईल क्षेत्रात भारती एअरटेल आणि जिओ यांच्यातील स्पर्धा शिगेला पोहोचली असतानाचा या दोन्ही कंपन्याचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि सुनील मित्तल पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकत असल्याचे वृत्त आहे. आता ही कुस्ती झी एन्टरटेनमेंट साठी असून या टीव्ही नेटवर्कसाठी मित्तल यांच्या बरोबरीने बोली लावण्यासाठी अंबानी सज्ज झाले असल्याचे समजते. झी ने याबाबत अजून काहीच सांगितले नसले तरी या संदर्भातील घोषणा लवकरच केली जाईल असे सांगण्यात येत आहे.
मुकेश अंबानी, सुनील मित्तल झी साठी येणार आमनेसामने
मुकेश अंबानी यांची रिलायंस जिओ इन्फोकॉम झी साठी बोली लावण्याच्या तयारीत असून अजून हा निर्णय प्राथमिक पातळीवर आहे असे समजते. सरकार लवकरच ५ जी स्पेक्ट्रमसाठी लिलाव पुकारणार आहे. त्यामुळे ज्याच्याकडे झीची मालकी जाईल त्याला त्याच्या प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ सेवा देण्याची मोठी संधी आहे. या व्हिडीओ सेवेतून कंपनीचा महसूल वाढणार आहे. गेले काही दिवस जगातील अनेक बड्या टेलिकॉम कंपन्यांनी टीव्ही प्रोडक्शन व केबल टीव्ही मध्ये हिस्सेदारी घेतली आहे.
झी एन्टरटेनमेंट कर्जात बुडाली आहे. त्यामुळे एखाद्या धोरणी गुंतवणूकदाराच्या शोधात आहे. सध्याच्या काळात ही कंपनी नेटफ्लिक्स व अमेझोन सारख्या प्लॅटफोर्मसह शेकडो लोकल चॅनल्सना टक्कर देते आहे. झी कडे सध्या १७३ देशात ७५ चॅनल्स व ४८०० मुव्हीज टायटल्स आहेत. कंपनीच्या लिलावात प्रथम सोनीनेही दिलचस्पी दाखविली होती. गेले काही दिवस भारती एअरटेल प्लॅटफॉर्मवर डिजिटल सेवा वाढवीत आहे. त्यामुळे झी कुणाच्या पदरात पडणार याची उत्सुकता आहे.