‘बिग बॉस’ या वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या १२ व्या पर्वात क्रिकेटपटू श्रीसंतच्या एण्ट्रीमुळे या शोला वेगळे वळण मिळाले होते. श्रीसंतच्या नावाची त्यामुळे छोट्या पडद्यावर चांगली चर्चा रंगल्याचे आपण पाहिलेच आहे. पण आता श्रीसंतकडे बॉसनंतर आणखी एका रिअॅलिटी शोची ऑफर आली असून या शोमध्ये तो लवकरच झळकण्याची शक्यता आहे.
नच बलिएच्या आगामी पर्वात झळकणार श्रीसंत ?
श्रीसंतला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘नच बलिए’कडून ऑफर आली आहे. या ऑफरवर सध्या श्रीसंत विचार करत असला तरी अद्याप त्याने होकार कळविलेला नाही. पण तो या शोमध्ये लवकरच झळकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. माझ्याकडे ‘नच बलिए’च्या निर्मात्यांनी प्रस्ताव ठेवला असून मी माझा होकार अद्याप तरी कळविला नाही. बीसीसीसीआयच्या निर्णयाची सध्या मी प्रतीक्षा करत असल्यामुळे ‘नच बलिए’ने ठेवलेल्या प्रस्तावावर होकार कळविला नसल्याचे श्रीसंतने म्हटले आहे. कोणत्याही क्षणी बीसीसीआयचा निर्णय येऊ शकतो. मी त्यामुळे ‘नच बलिए’साठी माझा होकार कळवत नाही. कारण साधारण ३-४ महिने ‘नच बलिए’ हा शो सुरु राहिल. त्यामुळे माझी सध्या द्विधा मनस्थिती झाली आहे.