उदयनराजे भोसले यांना राज ठाकरेंचा ‘मनसे’ पाठिंबा

combo
सातारा – काही दिवसांपुर्वीच एका जाहिर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणूक आपला पक्ष लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. पण कोणत्याही पक्षाला राज ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला नसला तरी सेना-भाजप युतीचा पराभव करण्याचा निश्चय केला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले यांना राज ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. नुकतीच उदयनराजे यांची मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि पाठिंबा जाहीर केला. ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीचे फोटो उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत लिहिले आहे की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भेटून पाठिंबा जाहीर केला. यावेळी जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष सर्व तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.


दरम्यान लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज ठाकरे स्टार प्रचारक असतील, अशी चर्चा आहे. पण यात कशा प्रकारे त्यांचा नक्की सहभाग असेल, ते राष्ट्रवादीच्या मंचावरुन प्रचार करणार की मनसेच्या मंचावरुनच करणार, याबाबत संदिग्धता आहे. राष्ट्रवादीसमोर ज्या मतदार संघात भाजप- शिवसेनेचे कडवे आव्हान असेल त्या मतदार संघात राज ठाकरे यांच्या सभांचे आयोजन केले जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली आहे.

Leave a Comment