निवडणूक न लढणारी मनसे 8 ते 9 ठिकाणी भाजपविरोधात घेणार सभा

raj-thakre
मुंबई – यंदाची लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला असला तरी मनसे नरेंद्र मोदी-अमित शहा यांचा पराभव करण्यासाठी सज्ज झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यभरात 8 ते 9 ठिकाणी भाजपविरोधात सभा घेणार असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

मनसेकडून सोलापूर, सातारा, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या भागात स्वतंत्र सभा घेण्यात येणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचे नियोजन पक्षाकडून थेट आघाडीच्या व्यासपीठावर उपस्थित न राहता करण्यात येत आहे. याबाबतची अधिकृत घोषणा गुढी पाडवा मेळाव्यामध्ये होण्याची शक्यता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या 13 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि भाजपवर तुफानी टीकास्त्र सोडले होते. राज यांनी 19 मार्चच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्येही लोकसभा लढवणार नसल्याचे सांगत राजकीय पटलावरुन अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना बाजूला करा, येत्या निवडणुकीत भाजपला मतदान करु नका असा प्रचार कार्यकर्त्यांनी करावा असे आवाहन केले होते. त्यानंतर येणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यात आपण बोलू असे सांगितले होते.

Leave a Comment